मुंबई - देशभरात रक्षाबंधन सण साजरा होत असताना राजकीय पक्षांकडून आगामी निवडणुकांची तयारी सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीची बैठक मुंबईत होत आहे. आजपासून होत असलेल्या या दोन दिवसीय बैठकीसाठी काँग्रेससह विरोधी पक्षातील दिग्गज नेते मुंबईत दाखल होत आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी याही मुंबईत दाखल झाल्या आहेत. माजी गृहमंत्री आणि काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी त्यांचं मुंबईत स्वागत केलं. यावेळी, आदित्य ठाकरेंनीही पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं.
ममता बॅनर्जींच्या स्वागताला आदित्य ठाकरे आवर्जुन उपस्थित होते. त्यावेळी, आदित्य कैसे हो.. असे म्हणत ममता बॅनर्जींनी त्यांची विचारपूस केली. विशेष म्हणजे मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंचा पाहुणचारही स्वीकारला. आज राखी पौर्णिमा साजरी होत आहे. देशभरात बहिणी भावाच्या या पवित्र सणाचा उत्साह दिसून येत आहे. त्यातच इंडिया बैठकीसाठी आलेल्या ममता बॅनर्जी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना राखी बांधली. ममता यांनी उद्धव ठाकरेंना भाऊ मानलं. यावेळी, मातोश्रीवर रश्मी ठाकरे यांचीही त्यांनी भेट घेतली.
दरम्यान, ममता बॅनर्जी यांनी जुहू येथे बिग बी अमिताभ बच्चन यांच्याही घरी भेट दिल्याचे समजते. मुंबईतील हॉटेल ग्रँड हयात येथे ३१ आणि १ ऑगस्ट रोजी इंडिया आघाडीची बैठक होत आहे.