मुंबई : पार्ले महोत्सवाचे आयोजन सातत्याने तसेच एवढे अचूक व्यवस्थापन करणारी ही टीम अगदी एखाद्या राज्यस्तरीय मिनी ऑलंपीक स्पर्धेचे आयोजनसुद्धा करू शकेल, असे गौरवोद्गार मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी काढले. भाजपा आमदार अॅड.पराग अळवणी आयोजित २२ व्या पार्ले महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
पार्ले महोत्सव हा एक ब्रँड झाला असून त्यासाठी पराग अळवणी व त्यांच्या टीमने अतिशय मेहनत घेतली आहे. आपला स्वार्थ पाहण्याच्या जमान्यात इतरांच्या मुलांसाठी एवढे मोठे व्यासपीठ निर्माण करण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या या टीमच्या मागे खंबीरपणे उभे रहा असे आवाहनही त्यांनी उपस्थितांना केले.
दरवर्षीप्रमाणे यंदाही पार्ले महोत्सवास स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून हजारो स्पर्धक यामध्ये सहभागी होणार आहेत. कबड्डी स्पर्धेत २७५ संघ तर वॉलीबॉल मध्ये १०० पेक्षा अधिक संघांनी भाग घेऊन उच्चांकच गाठला आहे. अतिशय उल्लेखनीय म्हणजे पहिल्या पार्ले महोत्सवात सहभागी झालेल्या स्पर्धकांची मुले आता स्पर्धेत येऊ लागली आहेत.
पहिल्या दिवशी, उद्घाटन सोहळ्यानंतर आयोजित शरीर सौष्ठव स्पर्धेमध्ये सुमारे २५० स्पर्धकांनी भाग घेऊन सहभागाचा उच्चांक गाठला. यावर्षी विविध ८ वजनी गटासाठीच्या स्पर्धेसोबत 'मेन्स फिजिक' स्पर्धासुद्धा घेण्यात आली. दोन्ही स्पर्धांचे टायटल '२२ वा पार्ले महोत्सव श्री' देण्यासाठी मुंबई पोलीसचे सह-आयुक्त सत्यनारायण चौधरी सुद्धा उपस्थित होते.
दुसऱ्या दिवशी चित्रकला, हस्ताक्षर, बुद्धिबळ, वॉलीबॉल, कबड्डी, बॉक्स क्रिकेट इत्यादी स्पर्धा सुरू झाल्या असून पुढील ३० तारखेपर्यंत हजारो स्पर्धा यातून भाग घेतील अशी माहिती प्रमुख आयोजक आमदार अँड.पराग अळवणी यांनी दिली.
२२ व्या पार्ले महोत्सवाच्या आयोजनात मिलिंद शिंदे, श्रीकृष्ण आंबेकर, प्रविर कपुर,विलास करमरकर, सुरेशन , इत्यादी यांनी महत्वाची भूमिका पार पाडली.