दिलासा; महाविद्यालये आता लवकरच हाेणार सुरू, उपस्थितीबाबत असतील असे नियम
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2021 07:45 AM2021-02-03T07:45:15+5:302021-02-03T07:48:14+5:30
Education News : सोमवारी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत शासन आणि विद्यापीठे यांच्या समन्वयातून महाविद्यालये सुरू करण्यासाठीचे एसओपी (स्टॅण्डर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर) तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला.
मुंबई : सोमवारी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत शासन आणि विद्यापीठे यांच्या समन्वयातून महाविद्यालये सुरू करण्यासाठीचे एसओपी (स्टॅण्डर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर) तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, एसओपीमध्ये संमिश्र म्हणजेच ऑनलाइन व ऑफलाइन उपस्थिती ठेवण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे समजते.
महाविद्यालये सुरू करताना संपूर्ण ऑफलाइन सुरू न करता विद्यार्थ्यांना ऑनलाइनचा पर्याय उपलब्ध असल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल. १०० टक्के ऑफलाइन उपस्थिती महाविद्यालये सुरू करता येणार नसल्याने त्यासाठी आवश्यक त्या एसओपी ठरविल्यानंतर, यूजीसीच्या मार्गदर्शक नियमानुसार टप्प्याटप्प्याने महाविद्यालये सुरू करण्यात येतील. हा निर्णय अंतिम टप्प्यात असून येत्या ४ ते ५ दिवसांत या निर्णयाची घोषणा होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले. हा निर्णय आता केवळ कागदावर येणे बाकी असून डिजास्टर मॅनेजमेन्टसोबत मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होईल आणि त्यानंतर तातडीने महाविद्यालय सुरू करण्याबबत निर्णय घेण्यात येईल असे समजते.
दरम्यान, एकीकडे महाविद्यालये सुरू करण्यासाठी शासन स्तरावर कुलगुरू, मंत्र्यांच्या बैठक सुरू असताना दुसरीकडे फेब्रुवारी महिना सुरू झाला, शैक्षणिक वर्षाचा शेवट आला. निदान म्हणून तरी आता उच्च व तंत्र शिक्षण विभागाने महाविद्याये सुरू करण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी विद्यार्थ्यांमधून जोर धरू लागली आहे.
वसतिगृह सुरू करण्याबाबतही चर्चा
बैठकीत वसतिगृह सुरू करण्याबाबतही चर्चा झाली. काही जिल्ह्यांत अजूनही काही वसतिगृह क्वॉरंटाइन सेंटर आहेत, तीदेखील टप्प्याटप्प्याने सुरू केली जाणार असल्याचे समजते.