लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मे महिन्याच्या तुलनेत जून महिन्यातील काेराेना संसर्गात ७२ टक्क्यांनी घट झाली आहे. दैनंदिन रुग्णसंख्येसह मृत्यूंचे प्रमाणही कमी झाल्याचे दिसून आले. दरम्यान, सध्या पाॅझिटिव्ही दराच्या निकषांनुसार, मुंबई लेव्हल तीनच्या स्तरांत असल्याची माहिती पालिकेने दिली.
१ ते २४ मेदरम्यान ४२ हजार ९९१ रुग्णांची नोंद झाली आहे, तर जूनमध्ये याच काळात हे प्रमाण ११ हजार ९२१ रुग्णांवर आले आहे. मे महिन्यात या काळात १ हजार ३५६ मृत्यू झाले होते, तर जून महिन्यात या काळात ४८८ मृत्यू झाले. सध्या मुंंबईतील रुग्णसंख्या आणि मृत्यूंचे प्रमाण कमी झाले असले तरीही विषाणूतील नवीन म्युटेशनमुळे धोका कमी झालेला नाही, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली. विषाणू नेहमी त्याची आनुवंशिक रचना बदलत राहतो. ताे जेव्हा त्याची रचना बदलताे, तेव्हा त्याला शास्त्रज्ञ एक नवीन नाव देतात. कोणताही विषाणू त्याचे रूप त्यावेळी बदलताे ज्यावेळी लोक विषाणूचा प्रभाव नष्ट करण्यासाठी लस किंवा औषधे घेतात. या लसी किंवा औषधांपासून वाचण्यासाठी विषाणूकडून रूप बदलले जाते. मात्र, आपण कायम मास्क वापरणे, हात स्वच्छ ठेवणे, सुरक्षित अंतर ठेवणे या गोष्टी आपल्या हातात आहेत, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.