मुंबईतून गावी स्थलांतर करणाऱ्या पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:06 AM2021-04-06T04:06:44+5:302021-04-06T04:06:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबईत आणि राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी ब्रेक द चेनच्या निमित्ताने शासनाने कडक निर्बंध ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईत आणि राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी ब्रेक द चेनच्या निमित्ताने शासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत. आधीच रोजगार व आयुष्याची आर्थिक परिस्थिती बिघडलेली असताना या कडक नियमांत निभाव लागणार नाही म्हणून अनेकजण आपल्या मूळ गावी परतू लागले आहेत. त्यातच शिक्षण विभागाने पहिली ते आठवीच्या वर्गातील विदयार्थ्यांना वर्गोन्नती देऊन मोठा दिलासा दिला आहे. स्थलांतर करणाऱ्या अनेक पालकांची आपल्या मुलांच्या परीक्षाबाबतची समस्या यामुळे सुटली. मात्र, दुसरीकडे अनेकांनी परीक्षा नाहीत तर आपल्या मुलांचे मूल्यमापन कसे होणार ? ते वर्षभर काय शिकले ? किती शिकले ? याचा आढावा कसा घेणार, अशा प्रश्नांत गुंतून पडले आहेत. मूळचे शैक्षणिक वर्ष वाया गेल्याचीच चिंता काही पालकांना सतावत असल्याचे चित्र आहे.
एकीकडे अकारिक मूल्यमापन, त्यांना दिले गेलेले स्वाध्याय, त्यांनी ऑनलाईन वर्गांना दर्शविलेली उपस्थिती, चाचण्यांना दिलेला प्रतिसाद या सर्वांच्या माध्यमातून एससीईआरटीकडून विद्यार्थ्यांना कशी वर्गोन्नती द्यावी यासंदर्भात मार्गदर्शक सूचना दिल्या जाणार आहेत. त्यामुळे विदयार्थ्यांची वर्षभरातील शैक्षणिक प्रगती काय याचा अंदाज नक्कीच पालकांना व शिक्षकांना येईल याची काळजी घेतली जाईल, अशी माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात येत आहे, तर दुसरीकडे वर्षभराच्या या विदयार्थ्यांच्या मूल्यमापनासाठी ऑनलाईन परीक्षांचा पर्याय का नाही स्वीकारला, असे प्रश्न पालक विचारत आहेत.
प्रतिक्रिया
शासनाने घेतलेला निर्णय हा परिस्थितीला अनुकूल आहे. मुलांना कसे आपण परीक्षेला पाठवू हेही विचार करण्याची गोष्ट आहे. यातून एकच आहे की, विद्यार्थी हा आळशी होईल. त्याला परिणामाचे गांभीर्य राहणार नाही. परंतु सातवी व आठवीच्या विद्यार्थ्याला पुढील अभ्यास हा अवघड जाणार आहे. कारण की त्याची अभ्यास करण्याची मानसिकता खालावणार आहे. त्यामुळे त्याच्या गुणवत्तेवर परिणाम होईल.
- अनिल जगताप, पालक
शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी शाळा बंद; परंतु शिक्षण सुरू, असा उपक्रम सुरू असून, ऑनलाईन शिक्षण, स्वाध्याय उपक्रम, विविध कार्यक्रम ऑनलाईनच्या माध्यमातून घेतले. तसेच स्वयंअध्ययनामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करण्याची सवय लागली. परंतु, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकडे मोबाईल, आर्थिक परिस्थिती, नेटवर्क अडचणीमुळे वरील ऑनलाईन शिक्षण घेता आले नाही, असे विद्यार्थी अशा शिक्षणापासून वंचित राहिले. पुढील शैक्षणिक वर्षात मागील इयत्तेची शैक्षणिक उद्दिष्टे अभ्यासक्रमात काहीअंशी घेतली तर हा निर्णय योग्य ठरेल.
सायली मयेकर, पालक
शासनाने परीक्षा रद्द करणे अयोग्य आहे. एकीकडे गुणवत्तावाढीसाठी प्रयत्न करायला सांगितले जातात. दुसरीकडे अनेक मुले ऑनलाईन किंवा ऑफलाईन वर्गच करू शकले नाहीत. त्यांना आता थेट पुढील वर्गात प्रवेश दिल्यास त्यांची शैक्षणिक हत्या केल्यासारखे शिक्षण खाते करीत आहे. अनेक गोरगरिबांची मुले ऑनलाईन शिक्षण घेऊ शकले नाहीत. त्यांना पुन्हा त्याच वर्गात शिक्षण देऊन मूळ प्रवाहात आणणे गरजेचे आहे.
शिवाजी डोईफोडे, पालक
शासनाने कोरोनामुळे परीक्षा रद्द केल्या, हा निर्णय योग्य आहे. सध्याची परिस्थितीही तेवढी गंभीर आहे. मात्र, यामुळे गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो. शाळा ऑनलाईन झाल्या. काही ठिकाणी त्याही नव्हत्या. त्यामुळे गुणवत्तेबाबत मात्र चिंतेची परिस्थिती आहे.
शिवाजी पवार, शिक्षणतज्ज्ञ
-----------
मुंबई पालिका शिक्षण विभागातील विद्यार्थी संख्या - ६९३५४२
पहिली - १३१८९५
दुसरी -१३३३८१
तिसरी -१४०५७८
चौथी -१४६५२५
पाचवी -३८६०९
सहावी -३७३२९
सातवी - ३५८९७
आठवी - २९३२८
एकूण - ६९३५४२
-------
उपसंचालक विभागाच्या अखत्यारितील विद्यार्थी संख्या
पहिली - २४३४०
दुसरी २५२४४
तिसरी २५४९२
चौथी २४९३३
पाचवी १३२३५७
सहावी १३८६५३
सातवी - १३७१९९
आठवी - १४६१५३
एकूण - ६५४३७१