दिलासा; १ ते १८ वयाेगटांत आढळली सर्वाधिक ५१.१८ टक्के अँटीबॉडीज
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2021 06:40 AM2021-06-29T06:40:25+5:302021-06-29T06:40:54+5:30
तिसऱ्या सेरो सर्वेक्षणातील माहिती
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान बालकांना संसर्ग होण्याचा धोका अधिक असल्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे. मात्र, महापालिकेने नुकत्याच केलेल्या तिसऱ्या सेरो सर्वेक्षणातून मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. १ ते १८ वयोगटांतील मुलांमध्ये सरासरी ५१.१८ टक्के प्रतिपिंडे (अँटिबाॅडिज) असल्याचे आढळून आली आहेत. दुसऱ्या लाटेचा संसर्ग आता पूर्णपणे नियंत्रणात आला आहे. मात्र, तिसऱ्या लाटेचा अंदाज व्यक्त करण्यात आल्याने पालिकेने १ एप्रिल ते १५ जून, २०२१ या काळात लहान मुलांचे सेरो सर्वेक्षण केले. वैद्यकीय प्रयोगशाळांमध्ये वेगवेगळ्या कारणांसाठी चाचणी करण्यासाठी संपूर्ण मुंबईतून आलेल्या रक्त नमुन्यांमधून विभागनिहाय नमुने घेऊन हे सर्वेक्षण करण्यात आले.
यांनी तयार केला अहवाल
सेरो सर्वेक्षणाचा अभ्यास आणि निष्कर्ष नायर रुग्णालयातील सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या गृह अधिकारी डॉ.गार्गी काकाणी यांची मुख्य अन्वेषक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती, तसेच नायर रुग्णालयाच्या बालरोग विभागातील डॉ.सुरभी राठी आणि सूक्ष्मजीवशास्त्र विभागातील सहयोगी प्राध्यापक डॉ.सची अग्रवाल यांनी सह अन्वेषक म्हणून योगदान दिले.
५० टक्के मुलांना यापूर्वीच झाला हाेता काेराेना
सेरो सर्वेक्षणातून मुंबईत सरासरी ५१.१८ टक्के मुलांमध्ये प्रतिपिंडे आढळली. पालिकेच्या ५४.३६ टक्के तर खासगी प्रयोगशाळातील ४७.०३ टक्के नमुन्यांमध्ये प्रतिपिंडे आढळून आली. १० ते १४ या वयोगटांत सर्वाधिक म्हणजे ५३.४३ टक्के मुलांमध्ये प्रतिपिंडे आढळली. मार्च, २०२१ मधील सर्वेक्षणात ३९.०४ टक्के प्रतिपिंडे आढळली होती.
असे झाले सर्वेक्षण
सर्व २४ प्रशासकीय विभागातील दोन हजार १७६ रक्त नमुने वेगवेगळ्या वैद्यकीय प्रयोगशाळांच्या माध्यमातून संकलित करण्यात आले. या रक्त नमुन्यांच्या चाचणीनंतर, प्रतिपिंडांसंदर्भातील चाचणी करण्यासाठी हे नमुने कस्तुरबा रुग्णालयातील सूक्ष्मजीवनिदान वैद्यकीय प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले.
वयोगट प्रतिपिंडे
(आकडेवारी टक्क्यांमध्ये)
१ ते ४ ५१.०४
५ ते ९ ४७.३३
१० ते १४ ५३.४३
१५ ते १८ ५१.३९