पालिकेच्या रुग्णालयांतील वैद्यकीय कर्मचाऱ्याना दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2020 06:30 PM2020-05-21T18:30:03+5:302020-05-21T18:30:32+5:30
अनेक समस्या सोडविण्याबाबत आरोग्य विभागाकडून मान्यता
मुंबई : पालिकेच्या विविध रुग्णालयात काम करत असलेल्या कर्मचाऱ्याना कोरोना महामारीच्या काळात योग्य सोयी सुविधा, संरक्षण देत नसल्याने अनेक कर्मचाऱ्याना कोरोनाची लागण झाली. त्यानंतर पालिका आरोग्य विभाग कर्मचाऱ्याच्या संरक्षणासाठी काहीही करत नसल्याने कर्मचाऱ्यामधून नाराजीचा सुर उमटत होता, ज्यामुळे कर्मचाऱ्यानी म्युनिसिपल मजदूर यूनियनच्या नेतुत्त्वाखाली सोमवारी निषेध व्यक्त केला व आपल्या समस्या बाबत संबधित अधिष्ठाता कड़े लेखी पत्रव्यवहार केला. ज्याची दखल घेत नुकत्याच झालेल्या वरिष्ठ आरोग्य आधिकाऱ्यानच्या एका बैठकीत कर्मचाऱ्याच्या मागण्या मान्य करण्याबाबत प्रशासनाने लेखी आश्वासन दिले असल्याची माहिती म्युनिसिपल मजदूर यूनियनचे चिटणीस प्रदीप नारकर यांनी दिली.
लॉकडाऊन दरम्यान उपनगरातून कर्तव्य बजावन्यासाठी येणाऱ्या सर्व संवर्गातील कर्मचाऱ्यांची रहाण्याची व्यवस्था परिसरातील हॉटेल्स व्यतिरिक्त, लॉज, हॉस्टेल्स, खाली असलेल्या वार्डमध्ये सोय करण्याच्या मागणीला मान्यता देण्यात आली असून कोव्हीड-१९ मध्ये काम करणाऱ्या सर्व संवर्गातील कर्मचाऱ्यांना यापुढे ५ दिवस काम आणि २ दिवस सुट्टी देण्यात येणार असल्याचे मान्य करण्यात आल्याची माहिती नारकर यांनी दिली. कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून ३ मार्च, २०२० पासून काम करणाऱ्या सर्व संवर्गातील कर्मचाऱ्यांना (रोजंदारी, बहुउद्देशीय कामगारांसहित) दैनंदिन रु. ३००/- तसेच कायम कर्मचाऱ्यांना ०१ एप्रिल, २०२० पासूनचां भत्ता बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.
या शिवाय सर्व संवर्गातील कर्मचाऱ्यांचां रुपये ५० लाखाचा विमा उतरविण्यात यावा तसेच कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव होऊन निधन झाल्यास त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना रुपये ५० लाखाचे विशेष अनुदान आणि शैक्षणिक अर्हतेनुसार कायस्वरुपी नोकरी देण्यात यावी असा प्रस्ताव आणि अशी शिफारस महापालिका आयुक्त यांना करण्याचे मान्य करण्यात आलेले आहे. ५५ वर्षे वरी सर्व संवर्गातील कर्मचाऱ्यांना आणि गरोदर महिलांना कोव्हीड-१९ मध्ये काम देण्यात येणार नाही. याशिवाय अन्य काही मागण्यांना ही मान्यता दिल्याची माहिती नारकर यांनी दिली.