आरोग्य विभागाची माहिती; सर्वाधिक मृत्यू हे ६१ ते ७० वयोगटातील
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचा विचार करता, कोरोनाच्या पहिल्या लाटेत सर्वाधिक संसर्ग हा ३१ ते ४० वयोगटात झालेला आढळून आला होता. तर सर्वाधिक मृत्यू हे ६१ ते ७० या वयोगटात झाल्याचे दिसून आले आहे. कोरोनाच्या दोन्ही लाटांतील संसर्गाची तीव्रता पाहता, दोन्ही लाटेत नवजात बालक ते १० वर्षांपर्यंतच्या रुग्णांचा मृत्युदर सारखा असल्याचे दिसून आले आहे.
राज्याच्या कोरोना टास्क फोर्सचे तज्ज्ञ डॉ. वसंत नागवेकर यांनी सांगितले, राज्यात तरुण कोरोना रुग्णांमधील मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. अतिदक्षता विभागात अत्यवस्थ असलेल्या रुग्णांत २० ते ५० वयोगटातील रुग्णांचा समावेश आहे, मात्र कोरोनाच्या संसर्गाचे विश्लेषण करण्यासाठी काही काळ प्रतीक्षा करणे गरजेचे आहे. मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात मृत्यूचे प्रमाण हे दोन टक्के होते, त्या तुलनेत एप्रिल २०२१ मध्ये मृत्यूचे प्रमाण ०.७७ टक्के असल्याचे दिसून आले. मे महिन्याच्या अखेरपर्यंत दैनंदिन मृत्यूंचे प्रमाण कमी होणार असल्याचेही निरीक्षण आहे.
राज्याच्या कोरोना मृत्यू विश्लेषण समितीचे डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले की, पहिल्या लाटेत १९.४४ लाख कोरोनाबाधित होते, तर ४५ हजार ४५६ मृत्यू झाले होते. २०२१ मध्ये ३१.१७ लाख कोरोना रुग्ण, तर २४ हजार ४०० बळींची नोंद आहे. यंदा या आजाराची तीव्रता अधिक असल्याचे दिसून आले, तसेच अतिदक्षता विभागातही अधिक रुग्णांची नोंद झाली. मात्र डॉक्टरांचा अनुभवही अधिक असल्यामुळे मृत्यूंचे प्रमाण कमी करण्यासाठी सातत्याने प्रयत्न होत आहेत.
चौकट
वय वर्षमृत्यूमृत्युदर
०-१० - २०२० - ९७ - ०.१४
२०२१ - १०८ - ०.१२
११-२० - २०२० - १८० - ०.१४
२०२१ - ६६ - ०.०३
६१-७० - २०२० - १४,५४७ - ६.८
२०२१ - ६९८६ - २.२८
--------------------------------------------