लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात लसीकरण ठप्प पडले असतानाच शनिवारी रात्री मुंबई महापालिकेकडे कोरोना लसीचे एक लाख ३४ हजार डोस दाखल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. ते लसीकरणासाठी पुढे वितरित केले जाणार असून, लसीकरणात अडथळे येणार नाही, याची काळजी घेतली जाणार असल्याची माहिती पालिकेने दिली. दुसरीकडे मुंबईत दररोज ७० हजार लोकांना लस देण्यात येत असून, मुंबईकरांनी काळजी करण्याचे कारण नसल्याचे महापालिकेने सांगितले.
महापालिकेच्या तसेच शासकीय रुग्णालयांमध्ये शनिवारी दुपारी १२ ते सायंकाळी ६ आणि रविवारी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत लसीकरण सुरू आहे, तर साठा नसल्याने खासगी रुग्णालयातील लसीकरण केंद्रात १०, ११ एप्रिल रोजी लसीकरण झाले नाही. १२ एप्रिल रोजीही येथे लसीकरण होणार नाही, असे असले तरी लससाठा अधिक प्रमाणावर उपलब्ध झाला तर खासगी रुग्णालयातही लसीकरण पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याने स्पष्ट केले. महापालिका आणि शासनातर्फे मुंबईत ४९, तर खासगी रुग्णालयात ७१ लसीकरण केंद्रे कार्यान्वित आहेत. या सर्व केंद्रांवर मिळून प्रतिदिन सरासरी ४० ते ५० हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात येते.