दिवसभरात अडीच हजार रुग्णांची नोंद
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईत कोरोना संसर्ग नियंत्रणात येण्याच्या दृष्टीने दिलासादायक आकडेवारी गेल्या काही दिवसांपासून पाहायला मिळत आहे. येथे रुग्णवाढीसोबतच मृतांचा आकडाही हळूहळू कमी होत आहे. मंगळवारीही मुंबईत रुग्णवाढ आणि मृतांच्या संख्येत घट झाली. मुंबईत मंगळवारी २ हजार ५५४ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ६२ मृत्यू झाले.
मुंबईचा रुग्ण बरे होण्याचा दर हा ९० टक्के इतका झाला आहे. मुंबईत ५ हजार २४० जण बरे होऊन घरी परतले आहेत. तर मुंबईत आतापर्यंत ५ लाख ९४ हजार ८५९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत कोरोना रुग्णवाढीचा दरही कमी झाला आहे. मुंबईत २७ मार्च ते ३ एप्रिलपर्यंतचा विचार केला असता, कोरोना रुग्ण वाढीचा दर हा ०.५८ टक्के इतका आहे. आतापर्यंत मुंबईत कोरोनामुळे झालेल्या मृतांची संख्या १३ हजार ४७० इतकी आहे.
मुंबईत २९ हजार ७६ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत, तर आतापर्यंत एकूण ५५ लाख ४२ हजार ८५९ चाचण्या करण्यात आल्या आहेत. तर मुंबईतील कंटेनमेंट झोनमध्ये काहीशी वाढ झाली आहे. मुंबईत सध्या ९८ सक्रिय कंटेनमेंट झोन आहेत. ७५३ सक्रिय सीलबंद इमारती आहेत. मागील २४ तासांत पालिका प्रशासनाने रुग्णांच्या संपर्कातील ८७९ अतिजोखमीच्या सहवासितांचा शोध घेतला आहे.