मुंबईकरांना दिलासा, आगारात डिझेलचा तुटवडा नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:11 AM2021-08-17T04:11:58+5:302021-08-17T04:11:58+5:30
मुंबई : राज्यात एसटी महामंडळाच्या अनेक आगारात डिझेलचा तुटवडा असल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे. काही गाड्या आगारात उभ्या आहेत. ...
मुंबई : राज्यात एसटी महामंडळाच्या अनेक आगारात डिझेलचा तुटवडा असल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे. काही गाड्या आगारात उभ्या आहेत. असे असले तरी मुंबई विभागातील पाचही आगारात डिझेलचा तुटवडा नाही. डिझेलअभावी एसटी वाहतुकीवर कोणताही परिणाम झाला नाही. मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.
एसटी महामंडळाला कोरोनाचा फटका बसला आहे. प्रवाशांच्या संख्येत कमालीची घट झाली आहे. अशा परिस्थितीत इंधन दरवाढ गगनाला भिडली आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या बससेवेची चाके उलटी फिरू लागली. राज्य परिवहन महामंडळाच्या अंदाजे दीड हजार गाड्या डिझेलअभावी डेपोत थांबून आहेत. एसटीची आर्थिक परिस्थिती खूप नाजूक आहे. त्यामुळे डिझेल खरेदीसाठी एसटीकडे आता रक्कम नाही. उपलब्ध डिझेलच्या आधारे एसटी प्रशासन लांब पल्ल्याच्या मार्गावरील गाड्या सोडत आहे. डिझेलचा पुरवठा झाला की वाहतूक पूर्ववत करण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र एक-दोन दिवसांत डिझेल संपवल्यावर पुन्हा हीच परिस्थिती निर्मांण होत आहे. रोज कोणत्या ना कोणत्या आगारात डिझेलअभावी गाड्या थांबून आहेत. जवळच्या व ग्रामीण भागात जाणाऱ्या फेऱ्या रद्द करीत आहे.
एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, मुंबई हे एसटीचे मध्यवर्ती ठिकाण आहे. मुंबई विभागातील पाचही आगारांना डिझेल तुटवडा जाणवला नाही. कोरोना काळात इतर ठिकाणी वाहतूक बंद असली तरी मुंबई महानगर क्षेत्रात एसटीची वाहतूक सुरू होती. कोरोनामुळे तोटा झाला असला तरी आगाराना डिझेलची कमतरता आली नाही. पनवेल आगारात अपवादात्मक वेळा डिझेल येण्यास उशीर झाला किंवा वीज गेली यामुळे काही गाड्या उभ्या राहिल्या पण त्यावर तात्काळ उपाययोजना करण्यात आल्या पण पूर्णवेळ गाड्या उभ्या राहिल्या नाहीत.
----
पुन्हा तोटा वाढला
एसटी महामंडळाच्या ३१९ बसपैकी दुसऱ्या लाटेनंतर पाच आगारांतून केवळ २१९ बस रस्त्यावरून धावत आहेत. एकीकडे डिझेलची दररोज होणारी वाढ आणि दुसरीकडे प्रवाशांचा न मिळणारा प्रतिसाद यामुळे एसटी महामंडळाची सेवा सुरू झाली असली तरी तोट्यात भर पडत असल्याचे दिसून येत आहे.
-----
उत्पन्न आणि खर्चाचा मेळ बसेना
राज्य परिवहन महामंडळाला रोज जवळपास ९ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते. यातले ७ कोटी रुपये फक्त डिझेलवरच खर्च होतात. कर्मचाऱ्यांचे पगार, गाड्यांची देखभाल व दुरुस्ती यावरचा खर्चही मोठा आहे. जमा-खर्चाचा मेळ बसत असल्याने एसटीला मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागत आहे.
---
राज्यात इतर आगारात डिझेल तुटवडा असला तरी मुंबई विभागात डिझेलची पुरवठ्यामध्ये कोणतीही समस्या निर्माण झाली नाही. त्यामुळे डिझेल अभावी एसटीच्या वाहतुकीवर परिणाम होण्याचा किंवा गाड्या उभ्या राहण्याचा प्रश्नच नाही.
वरिष्ठ अधिकारी एसटी महामंडळ