पेट प्रवेश परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:10 AM2021-03-13T04:10:38+5:302021-03-13T04:10:38+5:30
मुंबई : मुंबई विद्यापीठाकडून २०२० मधील पीएच.डी. आणि एमफील प्रवेश परीक्षेसाठीचे वेळापत्रक नुकतेच जाहीर करण्यात आले. मात्र आता पेट ...
मुंबई : मुंबई विद्यापीठाकडून २०२० मधील पीएच.डी. आणि एमफील प्रवेश परीक्षेसाठीचे वेळापत्रक नुकतेच जाहीर करण्यात आले. मात्र आता पेट परीक्षा वर्षातून दोन वेळा घेण्यात येणार असल्याचे प्र-कुलगुरू रवींद्र कुलकर्णी यांनी शुक्रवारी विद्यापीठाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात जाहीर केले. २०२१ पासूनच ही परीक्षा दोन वेळा घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितल्याने पेट परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
मुंबई विद्यापीठाने गेल्या वर्षी २७ फेब्रुवारी ते १८ मार्च २०२० दरम्यान पेट परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज मागवले होते. मात्र कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे त्यास चार वेळा मुदतवाढ देण्यात आली होती. पेट परीक्षेसाठी विद्यापीठाकडे ११ हजार ७५९ एवढे अर्ज प्राप्त झाले असून यामध्ये पीएच.डी.साठी ११ हजार ३५२ तर एमफील साठी ४०७ एवढे अर्ज प्राप्त झाले आहेत. यामध्ये पीएच.डी.साठी ४ हजार ९१४ एवढे विद्यार्थी असून ६ हजार ४३७ विद्यार्थिनींचा समावेश आहे, तर एमफीलसाठी १९७ विद्यार्थी आणि २१० विद्यार्थिनींचा समावेश आहे. मात्र २०२० मधील पेट परीक्षा २०२१ मध्ये घेण्यात येत असल्याने विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचा मुद्दा युवासेना सिनेट सदस्य अॅड. वैभव थोरात आणि धनराज कोहचाडे यांनी सिनेटमध्ये उपस्थित केला.
कोट
विद्यापीठाच्या या निर्णयामुळे पेट परीक्षा देण्याची संधी हुकलेल्या किंवा अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना लगेचच परीक्षा देण्याची संधी मिळणार आहे. जेणेकरून शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर पडण्याचे प्रमाण कमी होऊन विद्यापीठामधील संशोधनाला अधिक चालना मिळणार आहे.
- वैभव थोरात, सिनेट सदस्य युवासेना