आर्थिक दुर्बल घटकांच्या १० टक्के आरक्षणाचा लाभ; शासनाच्या सूचना
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ‘एसईबीसी’च्या ज्या उमेदवारांनी खुल्या प्रवर्गाकरिता अर्ज केला, मात्र विहित वयोमर्यादा ओलांडली, अशा विद्यार्थ्यांच्या जाहिरातीतील तरतुदीनुसार मागासवर्गीयांना देय असलेल्या वयोमर्यादा व परीक्षा शुल्काबाबतची सवलत कायम ठेवावी व त्यानुसार पुढील कार्यवाही करावी, अशा सूचना राज्य सरकारने एमपीएससी आयोगाला दिल्या. यामुळे एमपीएससीच्या एसईबीसी उमेदवारांना दिलासा मिळणार आहे.
एमपीएससीच्या सहसचिवांना शासनाने गुरुवारी सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गाच्या आरक्षणाबाबत सूचना दिल्या आहेत. एमपीएससीच्या रखडलेल्या विविध परीक्षांचे निकाल आणि मुलाखतींचा मार्ग राज्य सरकारने यामुळे मोकळा केला आहे. राज्य सरकारने मराठा समाजाला शिक्षण आणि सरकारी नोकरीत आर्थिक दुर्बल घटकांच्या १० टक्के आरक्षणाचा लाभ देण्याचा निर्णय घेताच एमपीएससीलाही भरतीप्रक्रियेसंदर्भात गुरुवारी सूचना पाठविल्या आहेत. यानुसार आता एमपीएससीच्या रखडलेल्या पूर्व व मुख्य परीक्षा आणि मुलाखतीसाठी ‘एसईबीसी’ वर्गातून निवड झालेल्या उमेदवारांना खुल्या व ईडब्ल्यूएस प्रवर्गातून लाभ घेता येईल.
दरम्यान, नव्याने पात्र ठरणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. यामुळे मराठा समाजातील काही उमेदवार आरक्षणामुळे पात्र ठरले असतील तरी मुलाखतीनंतरच पुढील प्रक्रिया पार पडेल.
* नव्याने पात्र ठरणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्याच्या सूचना
एमपीएससीला पत्र पाठवून ‘एसईबीसी’ वर्गाकरिता राखीव असलेली पदे खुल्या व आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गात (ईडब्ल्यूएस) रूपांतरित करून निकाल, मुलाखती, शारीरिक चाचणी परीक्षांचे निकाल सुधारित केल्यानंतर केवळ नव्याने पात्र ठरणाऱ्या उमेदवारांच्याच मुलाखती, परीक्षा व शारीरिक चाचणी घेण्याच्या सूचना राज्य सरकारने दिल्या आहेत. ज्या उमेदवारांची शारीरिक चाचणी प्रलंबित आहे, त्यांच्यासाठी सुधारित निकालानुसार ती घेण्यात यावी, अशा सूचनाही सरकारने एमपीएससीला केल्या आहेत.