मोहित कंबोज यांना दिलासा; २७ जूनपर्यंत अटक नाही, सत्र न्यायालयाचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2022 02:28 PM2022-06-13T14:28:14+5:302022-06-13T14:28:41+5:30
बँकेचे कर्ज बुडवल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने मोहित कंबोज यांच्यावर गुन्हा दाखल केला होता.
मुंबई - मागील अनेक दिवसांपासून भाजपा नेते मोहित कंबोज यांच्यावरील अटकेची टांगती तलवार आहे. कर्ज बुडवल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने मोहित कंबोज यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. परंतु त्याविरोधात अटकपूर्व जामीनासाठी कंबोज यांनी सत्र न्यायालयात अर्ज केला होता. न्यायालयाने मोहित कंबोज यांना दिलासा देत २७ जूनपर्यंत अटकपूर्व जामीन वाढवला आहे.
क्रूझवर एनसीबीने धाड टाकल्यानंतर नवाब मलिक आणि मोहित कंबोज आमनेसामने आले होते. त्यानंतर सातत्याने मोहित कंबोज(Mohit Kamboj) हे महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडत आहेत. इतकेच नाही तर शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही मोहित कंबोज यांच्यावर पत्रकार परिषदेत निशाणा साधला होता. मोहित कंबोजविरुद्ध नवाब मलिक, संजय राऊत असा सामना रंगला होता. कंबोज हे वारंवार संजय राऊत, मलिकांवर आरोप करत आहेत. त्यानंतर एका प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता.
काय आहे प्रकरण?
मोहित कंबोज यांच्या कंपनीने २०११ ते २०१५ या कालावधीत इंडियन ओव्हरसिज बँकेकडून ५२ कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. या बँकेची फसवणूक करत कर्ज बुडवल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. बँकेकडून कर्ज घेतले पण कर्जाची ही रक्कम ज्यासाठी घेतली होती त्या कामासाठी न वापरता इतरत्र वापरल्याचा मोहित कंबोज यांच्यावर आरोप आहे.
मोहित कंबोज यांनी आरोप फेटाळले
गुन्हा दाखल झाल्यानंतर कंबोज यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळले होते. कंबोज म्हणाले की, मुंबई पोलिसांनी माझ्याविरोधात एफआयआर दाखल केली आहे. एक जुनी कंपनी जी २०१७ मध्ये बंद झाली आहे. त्याचे बॅंक इश्यू काढून माझ्यावर गुन्हा दाखल केला आहे. मला असे वाटते की, महाविकास आघाडी सरकार असं करुन माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असेल किंवा मला धमकावण्याचा प्रयत्न करत असेल तर तसं अजिबात होणार नाही. हा नवाब मलिकांचा बदला असेल किंवा संजय राऊतांचा, मी याविरोधात कोर्टात कायदेशीर लढा देईन. आम्ही याला घाबरणार नाही" असे म्हणत म्हणत मोहित कंबोज यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले आणि कोर्टात आव्हान दिले होते. त्यावर कोर्टाने अटकपूर्व जामीन देत २७ जूनला पुढील सुनावणी ठेवली आहे.