एसटी कामगारांच्या आंदोलनामागे षडयंत्र?, कुणकुणही न लागल्याने पोलीस पुन्हा अपयशी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2022 05:45 AM2022-04-09T05:45:53+5:302022-04-09T05:47:05+5:30

हिंदुस्थानी भाऊच्या भडकावू भाषणानंतर हजारोच्या संख्येने रस्त्यावर उतरलेल्या विद्यार्थ्यांपाठोपाठ थेट शेकडोच्या संख्येने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी धडकून दगडफेक करणाऱ्या आंदोलकांना रोखण्यास तपास यंत्रणा पुन्हा कमी पडल्याचे दिसून आले.

Conspiracy behind the ST workers agitation mumbai police intelligence failure | एसटी कामगारांच्या आंदोलनामागे षडयंत्र?, कुणकुणही न लागल्याने पोलीस पुन्हा अपयशी

एसटी कामगारांच्या आंदोलनामागे षडयंत्र?, कुणकुणही न लागल्याने पोलीस पुन्हा अपयशी

Next

मुंबई :  

हिंदुस्थानी भाऊच्या भडकावू भाषणानंतर हजारोच्या संख्येने रस्त्यावर उतरलेल्या विद्यार्थ्यांपाठोपाठ थेट शेकडोच्या संख्येने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी धडकून दगडफेक करणाऱ्या आंदोलकांना रोखण्यास तपास यंत्रणा पुन्हा कमी पडल्याचे दिसून आले. त्यामुळे आंदोलन आणखीन चिघळले. याप्रकरणी गुन्हा नोंदवीत, आंदोलनामागे नेमके कोण आहे? याचा शोध पोलीस घेत आहेत.  

एसटीच्या विलीनीकरणाचा प्रश्न न सुटल्याने एसटी कामगार आक्रमक झाले आहेत. या एसटी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी थेट शरद पवार  यांच्या घरासमोर निदर्शने केली. आंदोलकांनी तर घराच्या दिशेने चपला भिरकावल्या, दगडफेक केली. या आंदोलनात महिलाही मोठ्या प्रमाणावर सहभागी होत्या. संतप्त आंदोलकांनी ठिय्या आंदोलन केले. आंदोलकांनी शिवराळ भाषेचा वापर करीत जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे वातावरण तापले होते. या आंदोलनाबाबत अनभिज्ञ असलेले पोलिसही चक्रावले. परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यानंतर, पोलीस तेथे दाखल झाले. त्यांनी आंदोलकांची धरपकड सुरू केली. याप्रकरणी गावदेवी पोलिसांनी १०० हून अधिक जणांवर गुन्हा दाखल केला.

 सदावर्ते यांच्या भाषणात आंदोलनाचा इशारा? 
गुरुवारी उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर, कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केलेल्या भाषणात, येत्या १२ एप्रिलला हिंदुस्थानी कष्टकरी बारामतीत येणार आहे आणि सर्व शरद पवारांची पोलखोल करणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध राजकारणी शरद पवार तुम्ही कितीही गलिच्छ राजकारण करा, परंतु, आम्हाला १२ तारखेला बारामतीत थांबवून दाखवा. नाहीतर तुम्ही बारामतीतून चालते व्हा, असा इशारा सदावर्ते यांनी दिला होता. त्यामुळे या भाषणाचाही यामागे काही  कनेक्शन होते का?  त्यापूर्वीच घडलेले हे आंदोलन पूर्वनियोजित होते का? याबाबत अधिक तपास सुरू आहे.

आंदोलक आले कुठून? 
मुळात, आझाद मैदान येथे बसलेला जमाव कमी होता. त्यातुलनेत, सिल्व्हर ओकच्या दिशेने आलेल्या जमाव अधिक असल्याचेही दिसून आले. एवढ्या मोठ्या प्रमाणात आलेल्या जमाव नेमका कुठून व कसा आला? याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत. यानंतर बारामतीत धडक देणार असल्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.  

... आणि अटक झाली
दीड तासाच्या चौकशीनंतर ॲड. गुणरत्न सदावर्ते यांना रात्री दहाच्या सुमारास कट रचणे, सरकारी कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्यासह विविध कलमांखाली अटक करण्यात आली. त्यांना रात्री वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले. उद्या त्यांना कोर्टात हजर केले जाईल. 
दरम्यान, शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्यात सहभागी झालेल्या २३ महिलांसह १०५ जणांना अटकेनंतर सेंट जॉर्ज रुग्णालयात वैद्यकीय चाचण्यांसाठी नेण्यात आले. त्यांच्या वैद्यकीय चाचण्या करण्यात येत असून हे नमुने अधिक तपासासाठी कलीना वैद्यकीय प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.

 

Web Title: Conspiracy behind the ST workers agitation mumbai police intelligence failure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.