लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांनी २०१९च्या निवडणुकीत अपक्ष असूनही भाजप उमेदवाराला हरवून सातव्यांंदा विजय मिळवला. याच रागात त्यांची राजकीय कारकिर्द संपवून त्यांनी पुढील निवडणूक लढवू नये म्हणून त्यांचा छळ सुरू करण्यात आल्याचा आरोप त्यांचा मुलगा अभिनव यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात केला. वडिलांनी ३२ वर्षांपासून प्रामाणिकपणे काम केल्यानेच ते सात वेळा निवडून आले. त्यांची प्रतिमा मलीन झाल्यास ते पुढील निवडणूक लढणार नाहीत आणि लढले तरी जिंकून येणार नाहीत, असा विचार करून त्यांच्या छळाचा कट आखला. चुकीचे व्हिडिओ व्हायरल केले, असे अभिनव यांनी पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत नमूद केले.
अभिनव यांच्या तक्रारीवरून दादरा नगर हवेलीचे प्रशासक प्रफुल्ल खेडा पटेल, जिल्हाधिकारी संदीप सिंग, तत्कालीन पोलीस अधीक्षक शरद दराडे, उपजिल्हाधिकार अपूर्वा शर्मा, उपविभागीय अधिकारी मनस्वी जैन, पोलीस निरीक्षक मनोज पटेल, रोहित यादव, फत्तेसिंग चौहान, तलाठी दिलीप पटेल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. यातील नऊ जणांनी कशा प्रकारे संगनमत करून छळ केला याचे पुरावे, यासंदर्भात वेळोवेळी केले तक्रार अर्ज अभिनवने पोलिसांकडे सादर केले. मुंबई पोलीस सखोल चौकशी करून न्याय मिळवून देतील या विश्वासाने त्यांनी येथे आत्महत्या केली. पोलिसांनी लवकरात लवकर सखोल तपास करून दोषींवर कारवाई ची मागणी अभिनव यांनी केली.