राजकीय कारकीर्द संपविण्यासाठी छळाचा कट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:09 AM2021-03-13T04:09:00+5:302021-03-13T04:09:00+5:30
मोहन डेलकर यांच्या मुलाचा आरोप राजकीय कारकीर्द संपविण्यासाठी छळाचा कट मोहन डेलकर यांच्या मुलाचा आरोप लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई ...
मोहन डेलकर यांच्या मुलाचा आरोप
राजकीय कारकीर्द संपविण्यासाठी छळाचा कट
मोहन डेलकर यांच्या मुलाचा आरोप
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांनी २०१९च्या निवडणुकीत अपक्ष असूनही भाजप उमेदवाराला हरवून सातव्यांंदा विजय मिळवला. याच रागात त्यांची राजकीय कारकीर्द संपवून त्यांनी पुढील निवडणूक लढवू नये म्हणून त्यांचा छळ सुरू करण्यात आल्याचा आरोप त्यांचा मुलगा अभिनव यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात केला.
वडिलांनी गेल्या ३२ वर्षांपासून प्रामाणिकपणे काम केले. त्यांचे काम व मेहनतीमुळेच ते सात वेळा निवडून आले. त्यामुळे त्यांची प्रतिमा मलीन झाल्यास ते पुढील निवडणूक लढणार नाहीत आणि जरी लढले तरी जिंकून येणार नाहीत, असा विचार करून त्यांच्या छळाचा कट आखण्यात आला. त्यांच्यावर आराेप करत चुकीचे व्हिडिओ व्हायरल करण्यात आले, असे अभिनव यांनी पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत नमूद केले.
अभिनव यांच्या तक्रारीवरून दादरा नगर हवेलीचे प्रशासक प्रफुल्ल खेडा पटेल, जिल्हाधिकारी संदीप सिंग, तत्कालीन पोलीस अधीक्षक शरद दराडे, उपजिल्हाधिकार अपूर्वा शर्मा, उपविभागीय अधिकारी मनस्वी जैन, पोलीस निरीक्षक मनोज पटेल, रोहित यादव, फत्तेसिंग चौहान, तलाठी दिलीप पटेल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील नऊ जणांनी त्यांचा कशा पद्धतीने संगनमत करून छळ केला याबाबतचे पुरावे, तसेच यासंदर्भात वेळोवेळी करण्यात आलेले तक्रार अर्ज अभिनवने पोलिसांकडे सादर केले.
तेथील प्रशासन मदत करणार नाही म्हणून त्यांनी मुंबईत आत्महत्या केली. मुंबई पोलीस याची सखोल चौकशी करून न्याय मिळवून देतील या विश्वासाने त्यांनी येथे आत्महत्या केली. आता पोलिसांनी लवकरात लवकर या प्रकरणाचा सखोल तपास करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी अभिनव यांनी केली.
..........................