“सुशांत प्रकरणात आदित्य ठाकरेंचा काहीही संबंध नाही; युवा नेत्याचं करिअर उद्ध्वस्त करण्याचं षडयंत्र”
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2020 05:41 PM2020-08-04T17:41:03+5:302020-08-04T17:43:07+5:30
बिहारच्या राजकारणासाठी या प्रकरणाचा वापर केला जात आहे. प्रत्येक जण आपापली राजकीय पोळी भाजून घेण्याचं काम करत आहे असा आरोप मंत्री अनिल परब यांनी लावला आहे.
मुंबई – बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत प्रकरणात आदित्य ठाकरे यांची प्रतिमा मलीन करण्याचा षडयंत्र केलं जातं आहे. सुशांत सिंग प्रकरणाशी आदित्य ठाकरेंचा काहीही संबंध नाही असं छातीठोकपणे सांगतो, ज्यांना वाटतं आदित्य यांचा संबंध आहे त्यांनी मीडियासमोर येऊन पुरावे सादर करावेत. पुरावे असतील तर बोलावं असं आवाहन शिवसेना मंत्री अनिल परब यांनी केलं आहे.
याबाबत अनिल परब म्हणाले की, केवळ युवा नेत्याचं नाव खराब करायचं, मुख्यमंत्र्यांची लोकप्रियता वाढतेय ते पाहून अशाप्रकारे नाव खराब करायचं हे सुरु आहे, नरेंद्र मोदींवर ग्रोधा हत्याकांडाचा आरोप आहे, अमित शहांचा सोहराबुद्दीन प्रकरणात नाव घेतलं गेलं, न्या. लोयांच्या मृत्यूप्रकरणी किती नावं घेतली गेली. आरोप करुन प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न याआधीही अनेकदा झाले आहेत. जे लोक व्हॉट्सअपवर हा मेसेज फिरवतायेत ते कोणत्या पक्षाशी संबंधित आहेत हे माहिती आहे. आम्ही तक्रार केली आहे, पोलीस तपास करतील, एखाद्याचं करिअर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत आहे, जे पुरावे असतील ते समोर घेऊन या असं त्यांनी सांगितले आहे.
तसेच जे पोलिसांशी सुरक्षा घेऊन ते गेले ५ वर्ष फिरतायेत आज त्यांना भीती वाटत असेल तर त्यांनी खुशाल राज्य सोडून जावं असा टोला अनिल परब यांनी अमृता फडणवीस यांना लगावला आहे. सुशांत सिंग राजपूत प्रकरण मुंबई पोलीस सक्षमपणे हाताळत आहे. सीबीआयकडे तपास द्यावा हे राजकारण आहे, पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यासारखं आहे, गेल्या ५ वर्षात किती आत्महत्या झाल्या आणि किती हत्या झाल्या त्यातील सीबीआयकडे किती सोपावल्या याचा लेखाजोखा व्हावा, मुंबई पोलिसांच्या पाठिशी राज्य सरकार ठामपणे उभं आहे. नितीश कुमार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नाहीत, बिहारच्या राजकारणासाठी या प्रकरणाचा वापर केला जात आहे. प्रत्येक जण आपापली राजकीय पोळी भाजून घेण्याचं काम करत आहे असा आरोप मंत्री अनिल परब यांनी लावला आहे.