Join us

सहकारी बँकांविरोधात सुरू आहे अफवांचे षड्यंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2020 4:51 AM

विद्याधर अनास्कर यांचा आरोप; सखोल तपासाची आवश्यकता

मुंबई : रिझर्व्ह बँकेने सहकारी बँकांच्या खासगीकरणाचे धोरण रेटण्यास सुरुवात केल्यापासून या बँकांच्या आर्थिक स्थितीबाबत अफवा पसरविण्याचे षड्यंत्र काही सहकारकंटकांनी पद्धतशीरपणे आखल्याचे प्रकर्षाने निदर्शनास येत आहे, असा आरोप राज्य सहकारी बँकांचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी केला आहे.अनास्कर पुढे म्हणाले की, ज्या बँकांबद्दल अफवा पसरविल्या जात आहेत, त्या सर्व मोठ्या बँका आहेत. लहान बँकांच्या बाबतीत अशी चर्चा होताना फारसे दिसत नाही. या सर्व बँकांना सहकारी बँकिंग क्षेत्रामध्ये मानाचे स्थान आहे. सारस्वतसारख्या बँकेला तर ‘फोर्बस्या कंपनीने जगात दुसरा क्रमांक दिला आहे. सध्या ज्या बँकांबद्दल प्रामुख्याने अफवा पसरविल्या जात आहेत त्या सर्व बँका हजार कोटींचेवर ठेवी असलेल्या बँका असून त्यांची आर्थिक परिस्थिती उत्तम आणि भक्कम असून या बँकांनी रिझर्व्ह बँकेचे सर्व निकष पूर्ण केलेले आहेत. या बँकांवर रिझर्व्ह बँकेने कोणतीही बंधने लादलेली नसून त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. मात्र असे असतानाही या मोठ्या बँकांविरुद्ध अफवांचे वादळ का उठविण्यात आले आहे? याचा तपास होणे गरजेचे आहे. तसेच अशा प्रकारच्या अफवा पसरवल्यामुळे या बँकांमधून ठेवी काढण्यास सुरुवात होईल.परिणामी या बँका अडचणीत आल्यावर त्यांना खासगी क्षेत्रातून भांडवल पुरवठा केला जाऊ शकतो. नुकत्याच पंजाब अ‍ॅण्ड महाराष्ट्र बँकेमध्ये झालेल्या घोटाळ्यांमुळे रिझर्व्ह बँकेसह या सर्व सहकारकंटकांना नागरी सहकारी बँका संपविण्याची आयती संधी मिळाली असून, त्यामुळेच या अफवा उठविल्या जात आहेत, असे फेडरेशनचे स्पष्ट मत असून या विरोधात लढा देण्यासाठी सर्व सहकारी बँकांनी एकत्र यावे असे आवाहन फेडरेशनतर्फे सर्व नागरी सहकारी बँकांना करण्यात येत आहे, असेही ते म्हणाले.नागरी बँका या व्यापारी बँकांपेक्षा सरसरिझर्व्ह बँकेच्या अहवालानुसार दि.३१ मार्च,२०१९ अखेर देशातील एकूण १५४४ नागरी सहकारी बँकांपैकी केवळ ७० बँका ‘ड’ वर्गात आहेत. सुमारे १२०० बँकांची भांडवल पर्याप्तता १२ टक्क्याच्या वर आहे. या क्षेत्राचा प्रोव्हिजनिंग कव्हरेज रेशो हा ६४ टक्के तर कमर्शिअल बँकांचा ४६ टक्के आहे. नागरी सहकारी बँकांचे अनुत्पादक कर्जाचे ढोबळ प्रमाण ७.०१ टक्के आहे, तर व्यापारी बँकांचे ९.५१ टक्के आहे.नागरी बँकांचे निव्वळ अनुत्पादक कर्जाचे प्रमाण केवळ २.७१ टक्के आहे, तर व्यापारी बँकांचे ५.६० टक्के आहे. म्हणजेच व्यावसायिकतेच्या बाबतीत नागरी सहकारी बँका या व्यापारी बँकांपेक्षा सरस असतानाही सहकारी बँकांमध्ये व्यावसायिकता नाही, असा आरोप जो रिझर्व्ह बँकेकडून करण्यात येतो, त्यात काही तथ्य नाही, असे राज्य सहकारी बँकांचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी म्हटले आहे.

टॅग्स :बँकिंग क्षेत्र