Join us

ठाकरेंच्या 'मातोश्री' बंगल्याबाहेर घातपात घडवण्याचा डाव; नेमकं काय आहे प्रकरण?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2024 2:16 PM

ठाकरे कुटुंबाच्या सुरक्षेची जबाबदारी केंद्र सरकारची आहे. महाराष्ट्रात जे डाऊटफूल सरकार आहे त्यांची नाही असं राऊतांनी स्पष्ट सांगितले.

मुंबई - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचा वांद्रे कलानगर इथला मातोश्री बंगला हा कायम महाराष्ट्राच्या राजकारणात केंद्रस्थानी राहिला आहे. बाळासाहेबांनंतर या बंगल्यात उद्धव ठाकरे आणि त्यांचे कुटुंब वास्तव्य करतायेत. मात्र या बंगल्याबाहेर घातपात घडवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महाराष्ट्र नियंत्रण कक्षाला एक निनावी फोन आला त्यात मुंबई गुजरात ट्रेन प्रवासात ४-५ तरुणांच्या संभाषणातून ही माहिती मिळाल्याचा दावा करण्यात आला. हे तरुण ऊर्दू भाषेत एकमेकांशी संवाद साधत होते. नियंत्रण कक्षाला फोन करून एकाने याबाबत माहिती दिली. त्यानंतर मुंबई पोलीस सतर्क झाली आहे. 

याबाबत ठाकरे गटाचे आमदार अजय चौधरी म्हणाले की, या देशात उद्धव ठाकरे हे भाजपासाठी अत्यंत अडचणीचा मुद्दा आहेत. उद्धव ठाकरेंवर असणारे हिंदू लोकांचे प्रेम हे भाजपाला अडचणीचे वाटतंय. त्यामुळे उद्धव ठाकरे हा त्यांच्यासाठी नाजूक विषय आहे. याआधाही बाळासाहेब ठाकरे असताना त्यांच्याविरोधात प्लॅन आखले गेले. असे धमकीचे फोन आले. उद्धव ठाकरेंना गोरगरिबांचे आशीर्वाद आहेत. शिवसैनिकांचे कवच आहे. त्यांच्यावर जर हल्ला झाला तर तो त्यांच्यावरच उलटल्याशिवाय राहणार नाही. जो हल्ला करेल त्याला शिवसैनिक सोडणार नाही असं त्यांनी म्हटलं. 

तर ठाकरे कुटुंबाच्या सुरक्षेची जबाबदारी केंद्र सरकारची आहे. महाराष्ट्रात जे डाऊटफूल सरकार आहे त्यांची नाही. हे सूडाने पेटलेले सरकार आहे. ज्याप्रमाणे ठाकरे कुटुंबाचे संरक्षण, शिवसेना नेत्यांचे संरक्षण काढून घेण्यात आले आहे. त्यामुळे उद्या भविष्यात काही घडले तर इथल्या आणि केंद्रातील गृह खात्याची ती जबाबदारी राहील असा इशारा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिला आहे. 

दरम्यान, हे तरुण कोण आहेत, कुठले आहेत याची माहिती आमच्याकडे आहे. राम मंदिर उडवून देण्याची धमकी देणारे विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते होते. त्यांनी मुस्लीम नावे घेतली होती. या देशात लोकसभा निवडणुकीआधी धार्मिक तेढ निर्माण करून निवडणूक जिंकायच्या हे भाजपाचे षडयंत्र आहे. ठाकरे कुटुंबाची सुरक्षा कमी केली ही कुठले राजकारण? आम्ही घाबरणार नाही. शिवसैनिक ठाकरे कुटुंबाच्या सुरक्षेसाठी कायम तयार आहेत असंही राऊत यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :उद्धव ठाकरेसंजय राऊतमुंबई पोलीस