Sana Malik On Ajit Pawar ( Marathi News ) : राज्यात ऑक्टोंबर महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत या निवडणुकांची घोषणा काही दिवसातच होऊ शकते. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व पक्षांनी तयारी सुरू केली आहे.दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राज्यात 'जनसन्मान यात्रा' सुरू आहे. जनसन्मान यात्रा आज मुंबईत होत आहे. या यात्रेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह बड्या नेत्यांची उपस्थिती आहे. यावेळी माजी मंत्री नवाब मलिक यांची मुलगी सना मलिक यांनी उपमुख्यंत्री अजित पवार यांचे कौतुक केले आहे. तसेच नवाब मलिक जेलमध्ये होते त्यावेळीच्या आठवणी सांगितल्या.
"लोकसभेला झालं तसं विधानसभेला होऊन देऊ नका", अजित पवार यांचं जनतेला आवाहन
सना मलिक म्हणाल्या, अजितदादा आमच्या अडचणीत नेहमी आम्हाला मदत करतात. माझ्या वडिलांच्या अनुपस्थित आम्ही या मतदारसंघात काम करत असताना त्यावेळी अनेकांनी कट, कारस्थानं केली. काम करु दिली नाहीत. आमचं काम थांबवण्यासाठी प्रयत्न केले. पण प्रत्येकवेळी अजितदादांनी आम्हाला साथ दिली. म्हणून आम्ही सांगतो कामात संकटात उपायचं नाव दादा आहे, असं कौतुकही सना मलिक यांनी केलं.
"अनेक दिवसांनी आपण एकत्र जमत आहोत, मुख्यमंत्री लाडकी योजना आता सुरू केली आहे. या योजनेचे फॉर्म भरताना अनेकांनी अफवा पसरवल्या, पण आम्ही सगळ्यांचे फॉर्म भरुन घेतले. आम्ही १७ ऑगस्टची वाट बघत होतो, पण १४ ऑगस्ट दिवशीच लोकांनी फोन करुन पैसे आल्याचे सांगितले. हे ऐकून आम्ही समाधानी झालो. ज्या लोकांचे फॉर्म भरलेले नाहीत त्यांचे आता फॉर्म भरण्याचे काम सुरू आहे, असंही सना मलिक म्हणाल्या.
"रक्षाबंधनाच्या पवित्र दिवशी अजितदादांनी आपला तालुका निवडला आहे. याबद्दल अजितदादांची आभारी आहे. पाच वर्षापूर्वी याच ठिकाणी आपण विधानसभेची तयारी सुरू केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या आमदाराला मंत्रिपद दिले, असंही मलिक म्हणाल्या.
अजित पवार-नवाब मलिक एकाच मंचावर
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा आज मुंबईतील वांद्रे पूर्व येथून अणुशक्तीनगरपर्यंत काढण्यात आली. यावेळी काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी यांनी वांद्रे येथील अजितदादांचे स्वागत करत यात्रेत सहभाग घेतला. मात्र त्यानंतर अणुशक्तीनगर येथे अजित पवारांची जनसन्मान यात्रा पोहचल्यानंतर तिथे व्यासपाठीवर नवाब मलिक आणि अजित पवार एकत्र आल्याचं पाहायला मिळाले. नवाब मलिकांना सोबत घेण्यावरून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना पत्र लिहिलं होते. मात्र भाजपाचा विरोध आणि फडणवीसांच्या पत्राला केराची टोपली दाखवत आज अजित पवारांनी नवाब मलिकांना सोबत घेतल्याचं चित्र दिसून आले.