परभणीच्या लाचखोर उपअधीक्षकासह कॉन्स्टेबलला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:05 AM2021-07-25T04:05:17+5:302021-07-25T04:05:17+5:30
मुंबई : मित्राच्या अपघाती मृत्यूसंबंधीच्या गुन्ह्यात न अडकविण्यासाठी एकाकडे दीड कोटींची लाच मागणाऱ्या परभणी जिल्ह्यातील एका पोलीस ...
मुंबई : मित्राच्या अपघाती मृत्यूसंबंधीच्या गुन्ह्यात न अडकविण्यासाठी एकाकडे दीड कोटींची लाच मागणाऱ्या परभणी जिल्ह्यातील एका पोलीस उपअधीक्षक व कॉन्स्टेबलला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) मुंबईच्या पथकाने अटक केली. राजेंद्र रामकरण पाल (वय ५५) व गणेश लक्ष्मणराव चव्हाण (३७) अशी त्यांची नावे आहेत. पाल हे परभणीतील सेलू विभागाचे उपअधीक्षक असून चव्हाण हा त्यांच्याकडे ऑर्डर्ली म्हणून कार्यरत होता. दीड कोटीपैकी दहा लाखांचा पहिला हप्ता स्वीकारताना शुक्रवारी त्यांना रंगेहाथ पकडले होते.
या प्रकाराची वाच्यता होऊ नये, यासाठी विशेष दक्षता म्हणून मुंबईच्या पथकाकडून ‘ट्रॅप’ करण्यात आला असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. सेलू पोलीस ठाण्यात ३ मे रोजी एका तरुणाच्या अपघाती मृत्यूबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याची पत्नी व तरुणाच्या मित्राची मोबाइलवरील संभाषणाची क्लिप व्हायरल झाली होती. उपअधीक्षक राजेंद्र पाल यांनी त्याला ९ जुलै रोजी कार्यालयात बोलावून घेतले. तुझे त्याच्या पत्नीशी झालेले संभाषण माझ्याकडे आहे, तुला जर या गुन्ह्यात अडकायचे नसल्यास मला २ कोटी दे, अशी मागणी केल्याने त्याने याबाबत थेट मुंबईच्या एसीबी कार्यालयात तक्रार दिली. त्यानंतर सापळा रचण्यात आला. तडजोडीत २ कोटीऐवजी दीड कोटी देण्याचे ठरले. शुक्रवारी कार्यालयात कॉन्स्टेबल चव्हाण हा फिर्यादीकडून १० लाखांचा पहिला हप्ता स्वीकारत असताना एसीबीच्या पथकाने त्याला रंगेहाथ पकडले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी पालला ही अटक केली असून स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.