एटीएसची कारवाई : गँगस्टर कनेक्शनप्रकरण
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मोक्काच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या आणि आर्थर रोड जेलमध्ये असलेल्या गँगस्टर हरिष मांडवीकर याच्या हस्तकाचे काम करणाऱ्या कारागृहातील एका हवालदाराला दहशतवादी विरोधी पथकाने (एटीएस) अटक केली. सुभाष घोळवे असे त्याचे नाव असून, त्याला साेमवार, २८ डिसेंबरपर्यंत कोठडी देण्यात आली आहे.
घोळवे हा जेलमधून मांडवीकरचे निरोप, त्याची पत्रे त्याच्या माणसांना पोहोचविण्याचे काम गेल्या काही महिन्यांपासून करीत होता. त्याच्यासह साजिद इलेक्ट्रिकवाला याला अमली पदार्थांचा साठा बाळगून त्याची विक्री करीत असल्याप्रकरणी २०१५ मध्ये अटक झाली होती. त्यांच्यावर मोक्काअंतर्गत खटल्याची सुनावणी न्यायालयात सुरू आहे. त्यातील साक्षीदारांना धमकाविण्याचे काम ताे करीत होता. त्यासाठी सचिन कोळेकर, सुजित पडवळकर यांना कारागृहातून चिठ्ठी पाठवित होता.
एटीएसने त्यांना अटक करून जेलमधील कनेक्शन चव्हाट्यावर आणले होते. एटीएसचे प्रमुख जयजीत सिंह, उप महानिरीक्षक शिवदीप लाडे यांनी याबाबत दिलेल्या सूचनांनुसार गँगस्टर मांडवीकर याला मदत करण्याऱ्या जेलमधील हवालदार घोळवेला शुक्रवारी अटक करण्यात आली.
...................