हवालदाराने केली फौजदाराला ठाण्यातच मारहाण
By admin | Published: September 23, 2014 11:51 PM2014-09-23T23:51:42+5:302014-09-23T23:51:42+5:30
एरव्ही कामाच्या वाटपावरून किंवा वरिष्ठांनी रिमार्क मारल्यानंतर एखाद्या कारखान्यात कामगारांचा संताप झाल्याचे अनेक प्रकार घडतात.
ठाणे : एरव्ही कामाच्या वाटपावरून किंवा वरिष्ठांनी रिमार्क मारल्यानंतर एखाद्या कारखान्यात कामगारांचा संताप झाल्याचे अनेक प्रकार घडतात. परंतु, ठाण्यात एका हवालदाराला दिलेले काम त्याने न केल्याने तशी नोंद स्टेशन डायरीत घेणाऱ्या फौजदारालाच थेट हॉकीस्टीकने मारहाण केल्याची घटना वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात घडली. एका अधिकाऱ्याला कर्मचाऱ्यानेच मारल्यामुळे ठाणे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.
आशीष उतेकर असे मारहाण करणाऱ्या हवालदाराचे नाव असून त्यांनी पोलीस उपनिरीक्षक सुशील संकपाळ यांना मारहाण केली. हा प्रकार २२ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वा. च्या सुमारास पोलीस ठाण्यातच घडला. सकपाळ यांनी उतेकरांना १८ सप्टेंबर रोजी आरोपीला सिव्हील रुग्णालयात घेऊन जाण्यास फर्मावले होते. त्यांनी या आदेशाचे पालन न करता निघून गेले. संकपाळ यांनी या प्रकाराची नोंद स्टेशन डायरीला घेतली. ही डायरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक क्षीरसागर यांच्या वाचनात आल्याने त्यांनी याबाबत विचारणा केली. पुढे आणखी आपल्यावर कारवाई होऊ शकते, ही शक्यता गृहीत धरून उतेकरांनी चार दिवसांनंतर या प्रकरणाचा राग काढला आणि संकपाळ यांच्यावर हॉकीस्टीकनेच हल्ला केला. यात त्यांच्या हाताला आणि पायाला मार लागला. इतर कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी केल्याने पुढील अनर्थ टळला. या घटनेनंतर आधी जिल्हा रुग्णालयात नंतर एका खासगी रुग्णालयात दाखल केलेल्या संकपाळ यांना आता डिस्चार्ज मिळाला आहे. मात्र, या प्रकरणाची पोलीस वर्तुळात जोरदार चर्चा आहे. यासंदर्भात वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात हवालदार उतेकरांविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यांना ठाणे न्यायालयाने २६ सप्टेंबरपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे ज्या पोलीस ठाण्यात हवालदार म्हणून काम केले, त्याच पोलीस ठाण्याच्या लॉकअपमध्ये राहण्याची वेळ आता उतेकरवर आली आहे. (प्रतिनिधी)