तळोजा कारागृह अधीक्षकांची हवालदाराला मध्यरात्री बेदम मारहाण!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2018 01:09 AM2018-09-06T01:09:33+5:302018-09-06T01:09:46+5:30
तळोजा कारागृहाचे अधीक्षक सदानंद गायकवाड यांनी एका हवालदाराला शिवीगाळ करीत बेदम मारहाण करण्याची घटना सोमवारी मध्यरात्री घडली.
- जमीर काझी
मुंबई : तळोजा कारागृहाचे अधीक्षक सदानंद गायकवाड यांनी एका हवालदाराला शिवीगाळ करीत बेदम मारहाण करण्याची घटना सोमवारी मध्यरात्री घडली. कंट्रोल रूममधील फोन बराच वेळ व्यस्त ठेवल्याने त्यांनी पहिल्यादा फोनवरून शिवीगाळ व नंतर जेलमध्ये येऊन मारहाण केल्याची तक्रार मधुकर कांबळे या हवालदाराने कारागृहाचे मुंबई विभागाचे उपमहानिरीक्षक व पोलिसांकडे केली आहे.
खारघर पोलिसांनी बुधवारी तळोजा कारागृहात जाऊन या प्रकरणी चौकशी केली. मारहाण झालेल्या ठिकाणाचे सीसीटीव्ही फुटेज घेण्यात आले आहेत. सोमवारी रात्री कारागृहातील हवालदार कांबळेंची कैद्यांच्या स्वयंपाक गृहात(मेस) ड्युटी होती. मध्यरात्री २ च्या सुमारास कंट्रोल रूममध्ये त्यांच्या एका नातेवाइकाचा फोन आला होता. त्याच्याशी ते बोलत असताना, अधीक्षक गायकवाड हे बाहेरून फोन करीत होते. बराच वेळ फोन ‘एंगेज’ राहिल्याने त्यांनी नंतर त्याला झापले. त्या वेळी त्यांच्यात फोनवरून वादावादी झाली. थोड्या वेळाने गायकवाड हे नाइट राउंडसाठी जेलमध्ये आले. त्यांनी कांबळे ड्युटीला असलेल्या ठिकाणी जाऊन त्याला शिवीगाळ करीत लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली.
या प्रकाराने अन्य रक्षकही भांबावून गेले. घडलेल्या घटनेमुळे संतप्त झालेले कांबळे यांनी मंगळवारी सकाळी मुंबईत येत विभागाचे कारागृहाचे उपमहानिरीक्षक राजवर्धन सिन्हा यांच्याकडे तक्रार दिली. त्यांच्या सूचनेनुसार या प्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात रितसर तक्रार दिली. बुधवारी पोलीस अधिकाऱ्याच्या एका पथकाने कारागृहात या प्रकरणाची चौकशी केली. घटनेवेळी ड्युटीवर असलेल्या संबंधित अधिकारी, रक्षकांचे जबाब घेण्यात आले आहेत.
आपल्याला फोनवरून सूचना द्यायची असताना, कांबळे हे त्यांच्या नातेवाइकाशी बराच वेळ बोलत राहिले. त्याचा त्यांना जाब विचारला असता, त्यांनी आपल्याला शिवीगाळ केली आहे. आपण त्यांना कसलीही मारहाण केलेली नाही. मी रिपोर्ट करेन, या भीतीने पहिल्यांदा स्वत:हून वरिष्ठाकडे तक्रार केली आहे. त्यांचे बंधू अमरावती कारागृहात अधिकारी असून, त्यांच्याशी असलेल्या वैरातून त्यांनी मुद्दामहून तक्रार केली आहे.
- संदानंद गायकवाड, अधीक्षक, तळोजा मध्यवर्ती कारागृह
अधीक्षकांनी मारहाण केल्या प्रकरणी कारागृहातील हवालदार कांबळे यांनी तक्रार दिली आहे. या प्रकरणाची शाहनिशा करण्यात येत असून, आता त्यासंबंधी काहीही सांगू शकत नाही. चौकशीनंतर गुन्हा दाखल करण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल.
- प्रदीप तिडकर, वरिष्ठ निरीक्षक, खारघर पोलीस ठाणे