कॉन्स्टेबल ते अधिकारी आता ‘आॅनलाइन’

By Admin | Published: October 19, 2015 01:35 AM2015-10-19T01:35:53+5:302015-10-19T01:35:53+5:30

महाराष्ट्र पोलीस दलाकडून आता आधुनिक तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करून पोलिसांचे काम सोपे करण्यावर भर दिला जाणार आहे.

Constable to officials now 'online' | कॉन्स्टेबल ते अधिकारी आता ‘आॅनलाइन’

कॉन्स्टेबल ते अधिकारी आता ‘आॅनलाइन’

googlenewsNext

मनीषा म्हात्रे, मुंबई
महाराष्ट्र पोलीस दलाकडून आता आधुनिक तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करून पोलिसांचे काम सोपे करण्यावर भर दिला जाणार आहे. ई-मेल, आणि व्हॉट्स अ‍ॅपच्या माध्यमातून पोलीस शिपायांसह आयपीएस अधिकाऱ्यांना एकत्रित आणले जाईल. पोलीस दलात आत्तापर्यंत एकूण १८१ नवे ई-मेल आयडी आणि ३९ ठिकाणी नवे व्हॉट्स अ‍ॅप नंबर सुरू करण्यात आल्याची माहिती राज्य पोलीस मुख्यालयाकडून मिळाली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रमुख असताना प्रवीण दीक्षित यांनी अद्ययावत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नागरिकांशी सतत संपर्क ठेवला होता. भ्रष्टाचारी लोकांवर नियंत्रण आणण्यासाठी त्यांनी मोबाइल-अ‍ॅपसह फेसबुकचा प्रभावी वापर केला. मोबाइल अ‍ॅपच्या माध्यमातून १७३ तक्रारी प्राप्त झाल्या. फेसबुक पेजलाही २८ हजार १४५ लाइक्स मिळाल्या. त्यापाठोपाठ महाराष्ट्र पोलीस दलातही आता हीच पद्धत राबविण्यात येणार आहे. दीक्षित यांनी पदभार स्वीकारल्याच्या दुसऱ्या दिवशीच याबाबतच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. महाराष्ट्रात सुमारे २ लाख २० हजार पोलिसांचा फौजफाटा कार्यरत आहे. त्यांच्या सूचनेनुसार, पोलिसांचे ई-मेल आयडी गोळा केले जात आहेत. महाराष्ट्र पोलिसांच्या वेबसाईटवर अधिकाऱ्यांचे व्हॉट्स अ‍ॅप क्रमांकदेखील देण्यात आले आहेत.
या माध्यमातून सर्व पोलीस आयुक्तालय आणि जिल्हा पोलीस दल हे राज्य मुख्यालयातील अधिकाऱ्यांच्या सहज संपर्कात राहणार आहे. प्रत्येक अपडेट व्हॉट्स अ‍ॅपच्या माध्यमातून अधिकारी तसेच संबंधितांपर्यंत पोहोचणार आहे. इंग्रजांच्या काळापासून सुरू असलेली वेळकाढू कामकाजाची पद्धत यामुळे सहजसोपी आणि अद्ययावत होणार आहे. पोलीस डायरी नोंद, आदेश बजावणीसाठी कागदोपत्री कारवाई, नोंद करत परवानगी घेणे-देणे या बाबीही आॅनलाइन होणार आहेत. यामुळे कामकाज सोपे, सुकर होण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. काही तत्काळ लागणाऱ्या परवानग्या आणि आदेश ई-मेलद्वारे पोच करणे शक्य होणार आहे. यात अंमलदारापासून आयपीएस अधिकारी, सर्वांनाच ई-मेलचा वापर करणे बंधनकारक करण्यात येत आहे. ज्या शिपायांचे ई-मेल आयडी नाहीत, त्यांचे आयडी बनवण्यात येत आहेत. या माध्यमातून कामातील गती साधून सर्वांना एकमेकांशी जोडणेही शक्य होणार आहे. आत्तापर्यंत १८१ नवे ई-मेल आयडी आणि ३९ नवे व्हॉट्स अ‍ॅप नंबर सुरू करण्यात आल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

Web Title: Constable to officials now 'online'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.