मुंबई - नाशिक येथील अनाथ आश्रम शाळेतील अल्पवयीन मुलींच्या लैंगिक छळाबाबत राज्य सरकारनं गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणात महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी खात्याच्या प्रधान सचिवांना पत्र लिहून ७ दिवसांच्या आत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे या आश्रमशाळेच्या संचालकांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.
याबाबत मंत्री लोढा म्हणाले की, सदर प्रकरण गंभीर असून त्याबाबत प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी १ समिती स्थापन करण्यात यावी. या समितीचा अहवाल पुढील ७ दिवसांच्या आत सादर करावा असं त्यांनी प्रधान सचिवांना दिलेल्या आदेशात म्हटलं आहे.
काय आहे प्रकरण?शहरातील म्हसरूळ शिवारातील एका ज्ञानदिप गुरुकुल आधाराश्रमात चौदा वर्षांच्या शाळकरी मुलीवर आधाराश्रमाच्या संचालकाकडून बलात्कार केल्याची घटना गुरुवारी (दि. २४) सकाळी उघडकीस आली होती. पोलिसांनी आधाराश्रमातील अन्य निवासी मुलींचाही जबाब नोंदवला. चार मुलींच्या जबाबातून त्यांच्यावरही लैंगिक अत्याचार झाल्याचे समोर आले. या जबाबानुसार पोलिसांनी संशयित हर्षल बाळकृष्ण मोरे (२८) याच्यावर आणखी गुन्हे दाखल करण्याच्या हालचाली सुरू केल्या. अटकेत असलेल्या हर्षल मोरे ऊर्फ सोनू सरविरुद्ध वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून शनिवारी (दि.२६) रात्री उशीरापर्यंत म्हसरुळ पोलीस ठाण्यात कारवाई सुरू होती.
म्हसरूळ शिवारातील द किंग फाउंडेशन नावाच्या संस्थेकडून चालविले जाणारे ज्ञानदीप गुरुकुल आधाराश्रमात एका अल्पवयीन मुलीवर महिनाभरापूर्वी तेथील संचालक संशयित हर्षल मोरे याने बलात्कार केल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली होती. पिडितेला संशयित हर्षल मोरे उर्फ सोनू सर याने १३ ऑक्टोबर २०२२ रोजी रात्री बारा वाजेच्या सुमारास इमारतीच्या पार्किंगमधील पत्र्याच्या खोलीत बळजबरीने हात धरून नेले होते. तेथे स्वत:चे हातपाय दाबून देण्याच्या बहाण्याने पिडितेला अश्लील व्हिडीओ दाखवून लैंगिक अत्याचार केल्याचे फिर्यादीत तिने म्हटले आहे.