मुंबई विद्यापीठात आज हाेणार संविधानाचा जागर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2023 07:30 AM2023-11-26T07:30:04+5:302023-11-26T07:32:36+5:30
Mumbai University : राष्ट्रीय संविधान दिन आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘द प्रॉब्लेम ऑफ रुपी’ या ग्रंथाच्या शताब्दी सोहळ्यानिमित्ताने मुंबई विद्यापीठात रविवारी, २६ नोव्हेंबरला विविध कार्यक्रम होणार आहेत.
मुंबई - राष्ट्रीय संविधान दिन आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘द प्रॉब्लेम ऑफ रुपी’ या ग्रंथाच्या शताब्दी सोहळ्यानिमित्ताने मुंबई विद्यापीठात रविवारी, २६ नोव्हेंबरला विविध कार्यक्रम होणार आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, लंडन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘प्रॉब्लेम ऑफ रुपी : मूळ आणि त्याचे निराकरण’ या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होईल. यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसचे कुलगुरू प्राचार्य डॉ. विष्णू मगरे, रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय मंडळाचे संचालक डॉ. सतीश मराठे यावेळी उपस्थित राहतील. कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली सर कावसजी जहांगीर दीक्षान्त सभागृहात सकाळी १० वाजता हा कार्यक्रम होईल.
परिषदेच्या पहिल्या सत्रात ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर्स इकॉनॉमिक थॉट्स अँड कंटेम्पररी रिलेव्हन्स’ या विषयावर डॉ. रूथ कट्टूमुरी, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, लंडन या मांडणी करणार आहेत. ‘डॉ. आंबेडकर्स कॉन्ट्रिब्युशन इन इन्ट्रोड्युशिंग कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन फॉर अपलिफ्टमेंट ऑफ द स्टेटस ऑफ इंडियन वुमेन’ या विषयावर डॉ. श्रुती तांबे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या मार्गदर्शन करणार आहेत. प्रसिद्ध कवी आणि कादंबरीकार जयराम पवार ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर अँड इंडियन कॉन्स्टिट्यूशन’ यावर प्रकाश टाकणार आहेत.
दुसऱ्या सत्रात ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर्स थॉट्स ऑन इंडियन ॲग्रिकल्चर अँड इट्स कंटेम्पररी रिलेव्हन्स’ या विषयावर डॉ. किसन इंगोले, ‘डॉ. आंबेडकर अँड द स्ट्रक्चर ऑफ कॉन्स्टिट्यूशन’ या विषयावर डॉ. भीमराव भोसले हे मांडणी करणार आहेत. समारोपीय सत्रासाठी डॉ. रमेश पतंगे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील.