'...तर निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय रद्द होईल'; उल्हास बापट यांनी स्पष्टच सांगितलं!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2023 11:13 AM2023-02-20T11:13:52+5:302023-02-20T11:13:59+5:30

राज्यात सुरु असणाऱ्या शिंदे विरुद्ध ठाकरे गटाच्या सत्तासंघर्षावर घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. 

Constitutional expert Ulhas Bapat has expressed his opinion on the ongoing power struggle between Shinde and Thackeray group in the state. | '...तर निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय रद्द होईल'; उल्हास बापट यांनी स्पष्टच सांगितलं!

'...तर निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय रद्द होईल'; उल्हास बापट यांनी स्पष्टच सांगितलं!

googlenewsNext

मुंबई: केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय घेतल्याने उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. तर सध्याच्या सत्तासंघर्षात एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाचं पारडं जड झालं आहे. 

निवडणूक आयोगाच्या या निकालाविरोधात उद्धव ठाकरे सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण शिंदे गटाला देण्याचा निर्णय चुकीचा असल्याचा दावा याचिकेत ठाकरे गटाकडून केला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. याचदरम्यान राज्यात सुरु असणाऱ्या सत्तासंघर्षावर घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. 

उल्हास बापट म्हणाले की, निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाचा परिणाम उद्या होणाऱ्या सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीत होणार नाही. उलट सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा परिणाम निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालावर होऊ शकतो. निवडणूक आयोगाने दिलेला निकाल मला अपेक्षित नव्हता. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागेपर्यंत निवडणूक आयोगाने निकाल देऊ नये, असं माझं मत होतं. परंतु सर्वोच्च न्यायालयाने विरुद्ध निर्णय दिल्यास निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय रद्द होईल, असं मत उल्हास बापट यांनी व्यक्त केलं आहे. 

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयात या आठवड्यात सुनावणी सुरू होत आहे. त्यावरही भावनेचा हा पेंडुलम कुणीकडे कसा झुकेल, हे कळेल. या अशा वातावरणातही उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिलेल्या शिवसैनिकांमध्ये टोकाची अस्वस्थता आहे. शिंदेंच्या शिवसेनेकडून केले जाणारे आनंद, उत्सव आणि टीकेचे बाण या लोकांना आणखी घायाळ करतील. तेव्हा आता खरी कसोटी शिंदे शिवसेनेतील नेत्यांची आहे. काँग्रेसमध्ये राजकारणावर भाष्य करताना विलासराव देशमुख नेहमी म्हणायचे, काँग्रेसमध्ये श्रद्धा आणि सबुरी हे दोन शब्द फार महत्त्वाचे आहेत. आज हे दोन शब्द शिंदेंच्या शिवसेनेसाठी तितकेच महत्त्वाचे ठरणार आहेत. 

निवडणूक आयोगाचा निर्णय घातक-

निवडणूक आयोगाचा निर्णय लोकशाहीच्या दृष्टीने अतिशय घातक निर्णय आहे. देशाचे स्वातंत्र्य संपले आहे, आता आम्ही बेबंदशाहीली सुरुवात केली आहे, असे पंतप्रधानांनी लाल किल्यावरुन जाहीर करावे. हा निर्णय अत्यंत अनपेक्षित आहे. चोरांना राज्यमान्यता देणे त्यांना भूषणाव वाटत असेल, पण चोर हा चोरच असतो. आज मिंध्ये गटाची आणि जगातल्या सगळ्यात मोठ्या पक्षाची दयनीय अवस्था झाली आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. 

नाव अन् चिन्ह मिळवलं; एकनाथ शिंदेंचं आता नवीन लक्ष्य-

एकनाथ शिंदे यांनी शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मिळवल्यानंतर आता पुन्हा ते उद्धव ठाकरेंना धक्का देण्याच्या तयारीत आहे. ठाकरेंची जिथे निर्विवाद सत्ता आहे अशा मुंबई महापालिकेत जोरदार धक्का देण्याची तयारी एकनाथ शिंदेंनी केली असल्याची माहिती समोर येत आहे. एकनाथ शिंदे यांचं पुढचं लक्ष्य मुंबईतले ठाकरे गटाचे नगरसेवक आहे. ठाकरे गटाच्या नगरसेवकांना शिंदे गटात आणण्यासाठी खास रणनिती आखण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंपुढे आता पुन्हा एक नवीन आव्हान उभे राहणार आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: Constitutional expert Ulhas Bapat has expressed his opinion on the ongoing power struggle between Shinde and Thackeray group in the state.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.