मुंबईत सहा लाख परवडणारी घरे बांधणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 06:11 AM2018-06-20T06:11:08+5:302018-06-20T06:11:08+5:30
म्हाडाच्या ५६ वसाहतींच्या पुनर्विकासासाठी प्राधिकरण प्रयत्नशील असून, या पुनर्विकास प्रक्रियेंतर्गत म्हाडाच्या इमारत प्रस्ताव परवानगी विभागाकडे ६० प्रस्ताव दाखल झाले आहेत.
मुंबई : म्हाडाच्या ५६ वसाहतींच्या पुनर्विकासासाठी प्राधिकरण प्रयत्नशील असून, या पुनर्विकास प्रक्रियेंतर्गत म्हाडाच्या इमारत प्रस्ताव परवानगी विभागाकडे ६० प्रस्ताव दाखल झाले आहेत. महत्त्वाचे म्हणजे, यातील सहा प्रस्तावांना मंजुरी देण्यात आल्याची माहिती म्हाडाने दिली आहे. यामुळे मुंबईत परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीला वेग येणार आहे. सोबतच भविष्यात सुमारे सहा लाख सदनिका उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाला (म्हाडा) नियोजन प्राधिकरणाचा दर्जा दिल्यानंतर म्हाडाकडे आतापर्यंत इमारत परवानगी, सुधारित नकाशे मंजुरी, भोगवटा प्रमाणपत्र इत्यादी मिळण्यासाठी सुमारे ६० प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. म्हाडाच्या जुन्या इमारतींचा पुनर्विकास जलदगतीने होऊन, तेथील रहिवाशांच्या पुनर्वसनाबरोबर भविष्यात सुमारे सहा लाख सदनिका उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
राज्य शासनाने २३ मे २०१८ रोजी अधिसूचना काढून म्हाडाला नियोजन प्राधिकरणाचा दर्जा दिला. त्यानंतर, म्हाडाच्या जुन्या वसाहतीतील इमारतींच्या पुनर्विकास प्रस्तावांना चालना देण्यासाठी, म्हाडा मुख्यालयात अभिन्यास मंजुरी कक्ष, बृहन्मुंबई क्षेत्र इमारत प्रस्ताव परवानगी कक्ष व प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत येणारे इमारत प्रस्ताव परवानगी या कामांसाठी तीन स्वतंत्र कक्ष कार्यान्वित केले आहेत.
>अधिकार प्राप्त
म्हाडाच्या मुंबई क्षेत्रामधील ११४ अभिन्यासाची जमीन म्हाडाची व त्यावर नियोजन प्राधिकरणाचे अधिकार म्हाडास प्राप्त झाल्यामुळे, पुनर्विकासास व परवडणाºया दरातील सदनिकांच्या निर्मितीला
वेग येणार आहे.
भविष्यात सुमारे सहा लाख सदनिका उपलब्ध होण्याची शक्यता आहे. मुंबई क्षेत्र इमारत प्रस्ताव परवानगी कक्षातील कामकाज विकास नियंत्रण नियमावली व एमआरटीपी कायद्यातील तरतुदीनुसार करण्यात येत आहे.
>सहा प्रस्तावांना मंजुरी
बृहन्मुंबई क्षेत्र इमारत प्रस्ताव परवानगी कक्षामार्फत नेहरूनगर, कुर्ला येथील त्रिमूर्ती सहकारी गृहनिर्माण संस्थेला नुकतेच भोगवटा प्रमाणपत्र, तसेच सहा इमारतींच्या विविध प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. उर्वरित प्रस्तावांची कार्यवाही प्रगतिपथावर आहे.
या कक्षांच्या माध्यमातून देण्यात येणारी परवानगी आॅनलाइन
पद्धतीने मिळावी, यासाठी मुंबई महानगरपालिकेने अंगीकृत केलेली संगणकीय आज्ञावली पालिकेच्या परवानगीने जशीच्या तशी म्हाडा कार्यालयातील सदरील कक्षांमध्ये वापरण्यात येणार आहे.
या कक्षांमधील कामकाज सुलभ व सुरळीत पार पाडण्यासाठी मुंबई महानगरपालिकेतील अनुभवी अभियंत्यांची मदत घेण्यात येणार आहे.