'मशीद बांधायची तर अब्दुल कलामांच्या नावाने बांधा, बाबरच्या नावाने कशाला?'
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2019 05:34 PM2019-02-09T17:34:16+5:302019-02-09T17:48:34+5:30
तेलंगणातील भाजपा आमदार टी राजासिंग यांनी रविवारी औरंगाबाद येथे हिंदू राष्ट्र समितीच्या मंचावरुन सभा घेतली. त्यानंतर, सोलापूर येथेही त्यांची सभा झाली.
मुंबई - राम मंदिर आणि बाबरी मशिदीच्या वादावर बोलताना, तेलंगणातील भाजपा आमदार टी राजासिंह यांनी मशीद बांधायला आमचा विरोध असल्याचे म्हटले. कारण, बाबर हा भारतीय नव्हता, तो परदेशातून भारतात आक्रमक बनून आला होता. त्यामुळे त्याची मशीद भारतात बांधायची गरज नाही. जर, मशीदच बांधायची असेल तर अब्दुल कलामांची बांधा, आम्ही तिथे माथा टेकू, असे स्पष्ट आणि परखड मत आमदार राजासिंह यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना व्यक्त केलं. तर, राम मंदिर झालंच पाहिजे, असेही ते म्हणाले.
तेलंगणातील भाजपा आमदार टी राजासिंह यांनी रविवारी औरंगाबाद येथे हिंदू राष्ट्र समितीच्या मंचावरुन सभा घेतली. त्यानंतर, सोलापूर येथेही त्यांची सभा झाली. या सभांमध्ये, देशात हिंदू राष्ट्र बनविण्याचा संकल्प टी राजासिंह यांनी व्यक्त केला. महाराष्ट्रातील सभेनंतर एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना सनातन, हिंदूराष्ट्र, आरएसस, औवेसी आणि बाबरी मशीद याबद्दल राजासिंह यांनी आपले मत व्यक्त केले. तेलंगणात मशिदीच्या जमिनी लाटून एमआयएमचे आमदार मोठे झाल्याचा आरोप त्यांनी केला. तर 2023 पर्यंत देशाला हिंदू राष्ट्र बनविण्याची शपथ घेतल्याचंही ते म्हणाले. तसेच संघाच्या शाखेत न जाणारे हिंदू नाहीत. मी सनातनचा कार्यकर्ता असून आमचा आणि आरएसएसचा काहीही संबंध नाही. मात्र, जो संघाच्या शाखेत जात नाही, तो हिंदू नाही.
तसेच भारत माता की जय आणि वंदे मातरम न बोलणाऱ्यांना या देशात राहण्याचा अधिकार नाही. तर, प्रत्येक हिंदूने आपल्या कुटुंबातील एक मुलगा संघाच्या शाखेत पाठवला पाहिजे. जो पुढे चालून देश आणि धर्माचे रक्षण करेल. सरसंघचालक मोहन भागवत हे माझे गुरू असून त्यांना भेटण्याची इच्छाही राजासिंह यांनी व्यक्त केली आहे. रोहिंग्या मुस्लिमांना असलेला विरोध योग्य असल्याचे सांगताना औवेसींवरही राजासिंह यांनी टीका केली. तेलंगणात मशिदींच्या जमिनी विकून एमआयएमचे आमदार मोठे झाल्याचं ते म्हणाले. दरम्यान, देशातील मुस्लिमांना माझा विरोध नाही, ते आमचे भाऊच आहेत. पण, देशाविरुद्ध काहीही ऐकून घेतले जाणार नाही, जो जसा बोलेल तशाच भाषेत त्याला उत्तर मिळेल, असेही राजासिंह यांनी ठणकावून सांगितले आहे.