टिळक ब्रिजसह ११ पुलांची पुनर्बांधणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2019 04:43 AM2019-12-17T04:43:54+5:302019-12-17T04:45:19+5:30
एमआरआयडीसीएलमार्फत होणार बांधकाम : महापालिका देणार पैसे, खर्चाचा भार वाढणार
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : रेल्वेच्या हद्दीतील पूल बांधण्यात नेहमीच अडथळा येत असल्याने महापालिकेच्या अखत्यारीतील पुलांची दुरुस्ती, पुनर्बांधणी रखडली होती. महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि.(एमआरआयडीसीएल) या संस्थेने पूल बांधण्याची तयारी दाखवली आहे.
यामध्ये दादरच्या टिळक पुलासह रेल्वे मार्गावरील ११ पूल आणि एका भुयारी मार्गाचा समावेश आहे. मात्र या सल्लागार सेवेसाठी व्यवस्थापन शुल्क व देखभाल शुल्कापोटी कंत्राटाच्या १९.२५ टक्के एवढी रक्कम महापालिकेला मोजावी लागणार आहे.
गेल्या दोन वर्षांत अंधेरी येथील गोखले पूल आणि छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील पादचारी पूल कोसळल्यानंतर त्यांच्या पुनर्बांधणीचा वाद उभा राहिला. तर लोअर परळ येथील डिलाईल रोड पुलाचे काम या वादामुळे लांबणीवर पडले. रेल्वे मार्गावरील पुलांचे बांधकाम करताना येत असलेल्या अडचणींवर मार्ग काढण्यासाठी एमआरआयडीसीएल या तज्ज्ञ संस्थेकडून मदत घेण्याचा प्रस्ताव मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी दिला आहे.
त्यानुसार मुंबईतील रेल्वेवरील पुलांच्या कामांसाठी या संस्थेची सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. मुंबईतील ११ रेल्वे पूल आणि एक भुयारी वाहतूक मार्गाचे काम या संस्थेच्या देखरेखीखाली होणार आहे. मात्र यासाठी एकूण प्रकल्प खर्चाच्या ११ टक्के व्यवस्थापन शुल्क देण्यात येणार आहे. त्याबरोबरच सव्वाआठ टक्के देखभाल शुल्क आकारण्यात येणार आहे. त्यामुळे रेल्वेच्या हद्दीतील पुलांच्या कामांसाठी महापालिकेला जादा पैसे मोजावे लागणार आहेत.
पुल कोसळल्याच्या दुर्घटना घडल्यानंतर पालिकेवर सर्वस्तरातून टीका झाली होती़ त्यानंतर पुलांची दुरूस्ती, देखभालीचा मुद्दा उपस्थित झाला़ त्यामध्येही हे काम कोण करणार यावरून पालिका व रेल्वे प्रशासनामध्ये वाद झाला होता़
अखेर पालिकेने पुल बांधण्यासाठी पैसे देण्याचे ठरवले व हा वाद मिटला़ त्यामुळे आता तरी मुंबईकरांना सुरक्षित व नवीन पुल मिळू शकतील़ मात्र त्यासाठीही काही वर्षांची प्रतीक्षा करावी लागणार आहे़
या प्रतीक्षेत वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे़ आधीच मेट्रोच्या कामांमुळे मुंबईत ठिकठिकाणी वाहतूक कोंडी सुरू आहे़ त्यात आता पुलांच्या कामामुळे वाहतूक कोंडी अधिक वाढेल़
या रेल्वेमार्गांवरील पुलांची पुनर्बांधणी...
च्भायखळा पूल
च्ओलीवंट पूल
च्आर्थर रोड पूल
च्गार्डन (एस ब्रिज) पूल
च्रे रोड पूल
च्करी रोड पूल
च्घाटकोपर पूल
च्बेलासिस पूल
च्महालक्ष्मी पूल
च्दादरचा टिळक पूल
च्ना.म. जोशी मार्ग डी. पी. रोड मध्य रेल्वेवरील पूल माटुंगा लेबर कॅम्पजवळील हार्बर लाइनखाली वाहतूक भुयारी मार्ग
च्सध्या सार्वजनिक बांधकाम विभागातील ६८ पुलांची कामे करण्यात येत असून त्यांच्या देखरेखीखाली ही कामे होत आहेत.
च्महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड ही संस्था महाराष्ट्र शासन आणि रेल्वे मंत्रालयाचा संयुक्त उपक्रम आहे. महाराष्ट्र राज्यातील विविध प्रकल्पांच्या कामांची अंमलबजावणी त्यांच्यामार्फत होते