४५ मेट्रिक टन क्षमतेचे ऑक्सिजन प्लांट उभारण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:06 AM2021-05-10T04:06:06+5:302021-05-10T04:06:06+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबई मनपाच्या रुग्णालयांमध्ये प्राणवायूची उपलब्धतता अधिक सुलभतेने व्हावी, या दृष्टीने महापालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात व ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई मनपाच्या रुग्णालयांमध्ये प्राणवायूची उपलब्धतता अधिक सुलभतेने व्हावी, या दृष्टीने महापालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात व बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर मनपा रुग्णालय या दाेन रुग्णालयांमध्ये अनुक्रमे प्रतिमिनिट ३९० लिटर व १२०० लिटर या क्षमतेचे पी.एस.ए. तंत्रावर आधारित ऑक्सिजन प्लांट कार्यरत आहेत. या व्यतिरिक्त आणखी १२ ठिकाणी पी.एस.ए. तंत्रावर आधारित व एकूण ४५ मेट्रिक टन क्षमतेचे ऑक्सिजन प्लांट उभारण्याची कार्यवाही आता अंतिम टप्प्यात आहे.
सध्या दररोज सरासरी सुमारे ४५ हजार व्यक्तींची कोविड चाचणी केली जाते. तसेच ज्या व्यक्तींचा चाचणी अहवाल कोविडबाधित असल्याचे आढळून आले आहे, अशा रुग्णांच्या निकटच्या संपर्कातील लाेकांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंगही केले जाते. धारावीसह सर्व २४ विभागांमध्ये उपाययोजना राबविण्यात येत आहेत. यामध्ये चेस द व्हायरस आणि ट्रेसिंग - टेस्टिंग - ट्रॅकिंग - ट्रिटिंग या चतु:सूत्री आधारित योजनांचा समावेश आहे. याअंतर्गत बाधित रुग्णांच्या निकटच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेत संबंधितांचे विलगीकरण करणे, आवश्यकतेनुसार संशयितांच्या व बाधितांच्या कोविड विषयक वैद्यकीय चाचण्या करणे आणि लक्षणे असलेल्या बाधितांवर सुनिश्चित कार्यपद्धतीनुसार अर्थात मेडिकल प्रोटोकॉलनुसार औषधोपचार करण्याचा समावेश आहे.
सध्या ३१ हजार ६९५ बेड उपलब्ध आहेत. यापैकी १२ हजार ७५४ ऑक्सिजन बेड आहेत, तर या व्यतिरिक्त अतिदक्षता कक्षांमधील २ हजार ९२९ बेडही कोविड रुग्णांसाठी उपलब्ध आहेत. २४ प्रशासकीय विभागांमध्ये कार्यरत असणाऱ्या वॉर रुम अंतर्गत प्रत्येकी १० रुग्णवाहिका तैनात असून रुग्णसेवेसाठी उपयोगात आणल्या जात आहेत. झोपडपट्टी परिसरासह इतर परिसरात असणाऱ्या सार्वजनिक शौचालयांचा होत असलेला वापर आणि त्यामुळे संसर्गाची शक्यता लक्षात घेऊन शौचालयांचे निर्जंतुकीकरण केले जात आहे. सार्वजनिक शौचालयांमध्ये साबण, सॅनिटायझर असण्याकडेही काळजीपूर्वक लक्ष दिले जात आहे.
..............................