अपघातस्थळी इमारत बांधकाम जोमात; पीडितांना अद्याप सरकारी मदत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2018 01:55 AM2018-07-31T01:55:53+5:302018-07-31T01:56:05+5:30

घाटकोपर विमान अपघाताला एक महिना उलटून गेल्यानंतरही या अपघातात मृत्यू पावलेल्या पीडितांच्या कुटुंबीयांना कोणतीही सरकारी मदत देण्यात आलेली नाही.

Construction of accidental building construction; The victims still do not have government help | अपघातस्थळी इमारत बांधकाम जोमात; पीडितांना अद्याप सरकारी मदत नाही

अपघातस्थळी इमारत बांधकाम जोमात; पीडितांना अद्याप सरकारी मदत नाही

Next

मुंबई : घाटकोपर विमान अपघाताला एक महिना उलटून गेल्यानंतरही या अपघातात मृत्यू पावलेल्या पीडितांच्या कुटुंबीयांना कोणतीही सरकारी मदत देण्यात आलेली नाही. अपघात ज्या ठिकाणी झाला होता त्या इमारतीच्या बांधकामाला अपघातानंतर १५ दिवसांनी काम करण्याची परवानगी देण्यात आल्यानंतर या ठिकाणी इमारतीचे इमले उभारण्याचे काम मात्र जोमात सुरू आहे. दुसरीकडे या दुर्घटनेत निधन झालेल्यांच्या कुटुंबीयांकडे लक्ष देण्यास कोणालाही वेळ मिळालेला दिसत नाही.
२८ जून रोजी झालेल्या या गंभीर अपघातात विमानातील चार व्यक्ती व एक पादचारी अशा एकूण पाच जणांचा मृत्यू झाला होता. त्या वेळी बळी गेलेल्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याच्या घोषणा करण्यात आल्या होत्या. अपघाताची चौकशी लवकरात लवकर करण्याची ग्वाही देण्यात आली होती. मात्र तसे काहीच झाले नसल्याची खंत अपघात मरण पावलेल्यांच्या कुटुुंबियांनी व्यक्त केली आहे.
अपघात झाल्यानंतर अपघातस्थळी सुरू असलेले बांधकामाचे काम तात्काळ थांबविण्यातआले होते. अपघाताच्या चौकशीसाठी परिस्थितीजन्य पुरावे मिळविण्यासाठी तसेच तपासासाठी विमान अपघात तपास विभागातर्फे पाहणीदेखील करण्यात आली. तोपर्यंत इमारतीचे बांधकाम थांबविण्यात आले होते. अपघातग्रस्त विमानाचा सांगाडा अपघातस्थळावरून हटविल्यानंतर या इमारतीच्या बांधकामाला परवानगी देण्यात आली.
अपघातग्रस्त विमानाच्या सहवैमानिक मारिया जुबेरी यांचे पती प्रभात कथुरिया व इंजिनीअर सुरभी यांचे बंधू सुमित यांनी घडलेल्या या दुर्घटनेबाबत तसेच त्यानंतर तपासासाठी होणाऱ्या निष्काळजीपणाबाबत दु:ख व्यक्त केले आहे. सरकारकडून या अपघाताच्या चौकशीसाठी पुरेसा पुढाकार घेतला जात नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली.

जळालेला बॅनर अजूनही तिथेच
इमारतीच्या ज्या मोकळ्या भागात विमान कोसळले होते तेथे आता इमारतीचे बांधकाम करण्यात येत असून अपघात झालेल्या ठिकाणी पत्रे लावून पूर्वीप्रमाणे तो भाग बंदिस्त करण्यात आला आहे. इमारतीच्या बाहेरील बाजूला इमारतीच्या प्रकल्पाची माहिती देण्यासाठी लावण्यात आलेल्या बॅनरवर विमानाचे जळते इंधन पडल्याने ते बॅनर काही ठिकाणी जळाले होते. ते बॅनर अजूनही तसेच ठेवण्यात आले आहे. विमान कोसळताना झाडाच्या भागावरून घासत पुढे गेल्याने ते झाड मोडले होते त्या झाडाचा केवळ बुंधा व थोडासा भाग उरलेला आहे. या दोन चिन्हांव्यतिरिक्त या ठिकाणी विमान अपघात झाल्याचे कोणतेही पुरावे मागे राहिलेले नाहीत.

Web Title: Construction of accidental building construction; The victims still do not have government help

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई