गौरी टेंबकर - कलगुटकर
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई
समुद्रकिनाऱ्यापासून काही मिनिटांच्या अंतरावर असलेल्या महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) च्या गोराईतील जागेवर अनधिकृतपणे घरे बांधत, त्यांची विक्री केल्याचा प्रकार सोमवारी उघड झाला. याप्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्याच्या तक्रारीनंतर गोराई पोलिसांनी एका इसमाविरोधात फसवणुकीसह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला असून, सध्या याप्रकरणी चौकशी सुरू आहे.
गोराईच्या सर्व्हे क्रमांक ५३ येथे एमटीडीसीची जागा आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी या जागेवर अनधिकृतपणे घरांचे बांधकाम करत त्याची विक्री केली जात असल्याची तक्रार महामंडळाला मिळाली होती. त्यानुसार संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत सर्वेक्षण केले. माहितीत तथ्य आढळल्यावर याची तक्रार १९ मे २०२१ रोजी गोराई पोलिसांकडे करण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी चौकशी करत ७ सप्टेंबर २०२१ रोजी दिनेश पवळे आणि त्याच्या पत्नीविरोधात दखलपात्र गुन्हा नोंद केला. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नसून, तपास सुरू आहे.
अनेकांची फसवणूक झाल्याची माहिती
गोराईतील जागा समुद्रकिनाऱ्यापासून अवघ्या १५ मिनिटांच्या अंतरावर असून, त्यावर घरांचे बांधकाम करत विक्री करून अनेकांची फसवणूक केली गेल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. त्यानुसार आम्ही याप्रकरणी गुन्हा दाखल करत अन्य कोणाची याप्रकरणी फसवणूक होऊ नये, अशी आमची इच्छा आहे.
(सुभाष देखणे - महाराष्ट्र पर्यटन विभाग महामंडळ, वरिष्ठ व्यवस्थापक परिमंडळ)