मुंबई : जोपर्यंत भायखळ्यातील वायुप्रदूषण पूर्णपणे कमी होत नाही तोपर्यंत या विभागातील बांधकाम प्रकल्पांवरील निर्बंध कायम राहतील, अशी स्पष्टोक्ती महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी बुधवारी दिली. शिवाय, वारंवार सूचना देऊनही नियम न पाळणाऱ्या बांधकाम प्रकल्पांवर कठोर कारवाईच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी पालिका कठोर उपाययोजना करीत आहे. सातत्याने हवेची वाईट श्रेणी असलेल्या भायखळा आणि बोरीवली पूर्व भागांतील सर्व प्रकारची बांधकामे सरसकट बंद करण्यात आली आहेत. या पार्श्वभूमीवर तेथे काय स्थिती आहे, हे जाणून घेण्यासाठी आयुक्तांनी बुधवारी भायखळ्यातील बांधकाम प्रकल्पांना अचानक भेट देऊन स्थळपाहणी केली. आयुक्तांनी सातरस्ता परिसरातील दोन खासगी इमारत बांधकाम प्रकल्पांची पाहणी केली.
झोपडपट्टी प्रकल्प, बेकरीचे केले निरीक्षण तसेच, मुंबई सेंट्रल परिसरात बांधकामाधीन मेट्रो ३ प्रकल्पाची ठिकाणे, माझगाव येथील जोसेफ बाप्टिस्टा उद्यानाच्या नजीक डोंगरबाबा येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प आणि याच ठिकाणी असलेली बेकरी यांचीही पाहणी आयुक्तांनी केली.
त्याचप्रमाणे बाप्टिस्टा उद्यानालगत केंद्र शासनाच्या भूविज्ञान मंत्रालयाअंतर्गत येणारी भारतीय उष्णकटिबंधीय हवामान शास्त्र संस्था (पुणे) आणि पालिकेच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात आलेल्या ‘सफर’ हवामान केंद्राचीही त्यांनी पाहणी केली.