लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : धारावीतील वाहतूककोंडीचा निचरा करण्यासाठी नवे पूल उभारण्यासाठी शालेय शिक्षणमंत्री आणि स्थानिक आमदार वर्षा गायकवाड यांनी पालिका प्रशासनाला पत्र पाठविले आहे. धारावीतील वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी तातडीने पुलांच्या निर्मितीचे काम हाती घेण्याच्या सूचना गायकवाड यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
धारावीतील वाहतूककोंडीची समस्या सोडवण्यासाठी मंत्री वर्षा गायकवाड यांनी पालिकेच्या पूल विभागाच्या प्रमुख अभियंत्यांना पत्राद्वारे निवेदन दिले. तसेच, यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन ही विकासकामे लवकरात लवकर मार्गी लावण्याच्या सूचना केल्या. धारावीत टी.एच. कटारिया मार्ग ते भाऊ दाजी मार्ग हा पूल, सायन हाॅस्पिटलच्या बाजूला असलेल्या रेल्वेपुलावरून बी.ए.रोडवरील अस्तित्वात असलेल्या पुलाला जोडणारा पूल तसेच सायन हाॅस्पिटलच्या पश्चिमेस आर.डी. भंडारे चौकवरून टी. जंक्शनकडे जाणाऱ्या रस्त्यावर पूल उभारणे गरजेचे आहे. तसेच, शाहूनगर स्कायवाॅकवरून आझादनगरला उतरण्यासाठी जिना बांधकाम करणे आवश्यक असल्याचे मंत्री गायकवाड यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. या पुलांच्या बांधकामांसह अन्य विकासकामांसाठी आपल्या स्तरावर आवश्यक कार्यवाही करावी, अशा सूचनाही मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिल्या.
तसेच, धारावीत ट्रान्झिट कॅम्प म्युनिसिपल शाळेत अधिकाऱ्यांसोबत मतदारसंघातील सर्व शाळांच्या पायाभूत सुविधांबाबत मंत्री गायकवाड यांनी आढावा बैठक घेतली. विद्यार्थ्यांसाठी पायाभूत सुविधा असणे ही चांगल्या शाळेची ओळख आहे, असे सांगतानाच शाळांतील भौतिक, पायाभूत सुविधांत वाढ, शालेय परिसराचे सुशोभीकरण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.