मुंबई : धोकादायक लोअर परळ पूल पाडून नव्याने उभारण्याच्या कामाबाबत रेल्वे आणि महापालिका यांच्यात समन्वयाचा अभाव असल्याचे दिसून आले आहे. लोअर परळ पुलाच्या कामाबाबत पश्चिम रेल्वे अधिकाऱ्यांनी महापालिकेला पत्र लिहिले आहे. यावर महापालिकेकडून अद्याप कोणतेही उत्तर मिळालेले नाही. परिणामी महापालिकेकडून प्रतिसाद मिळाल्यानंतर पुलाच्या प्रत्यक्ष कामाबाबत निर्णय घेण्यात येईल, असे पश्चिम रेल्वेच्या अधिकाºयांनी सांगितले.लोअर परळच्या पुलाच्या खांबाखाली केबल्स, पाण्याची पाइपलाइन, अन्य यंत्रणांची लाइन गेल्या आहेत. याची योग्य आणि आवश्यक माहिती नसल्यामुळे पुलाची उभारणी महापालिकेने करावी असे दुसºयांदा पत्र लिहिण्यात आले आहे. सामान्यत: रेल्वे स्थानकावरील पूल (आरओबी) हे समांतर अथवा आडवे असतात. मात्र लोअर परळ स्थानकातील रेल्वे रुळांवरील पुलाचा भाग हा उतरता आहे. लोअर परळ पूल महापालिकेचा आहे. रेल्वे रूळ आणि ओव्हरहेड वायर यांच्या सद्य:स्थितीतील सुरक्षिततेच्या परिमाणानुसार नव्याने उभारण्यात येणाºया पुलाची उंची १.५ मीटरपर्यंत वाढविणे आवश्यक राहणार असल्याचे वरिष्ठ अधिकाºयांनी गोपनीयतेच्या अटीवर सांगितले.पूल पाडून नव्याने उभारण्याच्या कामाला जर आज सुरुवात केली तर सुरुवातीचे ३ महिने निविदा प्रक्रियेत जातील. यानंतर निविदाकाराकडून पूल पाडकामासाठी सुमारे ३ महिन्यांचा कालावधी लागेल. यानंतर प्रत्यक्ष पुलाच्या उभारणीच्या कामाला १८ महिन्यांचा काळ अपेक्षित आहे.त्यामुळे आजच्या तारखेला जर या पुलाच्या कामासंदर्भातील निविदा प्रक्रियेस सुरुवात झाली असली तरी प्रत्यक्षात नवीन पुलाच्या उभारणीला तब्बल दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे.
...तर पूल उभारणीला दोन वर्षे लागणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 4:42 AM