Join us

बांधकाम व्यवसायाला मिळणार चालना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 4:06 AM

तज्ज्ञांचे मतलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : लॉकडाउनच्या काळात बांधकाम क्षेत्रातील कामे सुरू ठेवण्यास शासनाच्या वतीने परवानगी देण्यात आली ...

तज्ज्ञांचे मत

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : लॉकडाउनच्या काळात बांधकाम क्षेत्रातील कामे सुरू ठेवण्यास शासनाच्या वतीने परवानगी देण्यात आली आहे. मात्र, प्रकल्पाच्या ठिकाणी काम करणारे अनेक कामगार भीतीपोटी आपल्या राज्यात निघून गेले. यामुळे काम सुरू असूनही मनुष्यबळाअभावी बांधकाम व्यवसाय अडचणीत सापडला आहे. बांधकाम प्रकल्पाच्या ठिकाणी काम करणारे मजूर हे २० ते ४० वयोगटातील आहे. आता सरकारच्या वतीने १ मे पासून १८ वर्षांवरील नागरिकांना लसीकरणास परवानगी देण्यात आल्याने जास्तीत जास्त मजूर स्वतःला लस टोचून घेऊन पुन्हा एकदा बांधकाम प्रकल्पांवर काम करण्यास रुजू होतील, अशी विकासकांना आशा आहे. त्यामुळे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अडचणीत सापडलेला बांधकाम व्यवसाय पुन्हा एकदा रुळावर येईल, असे मत बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञांनी मांडले.

दुसऱ्या लॉकडाऊनच्या काळात शासनाच्यावतीने घालून दिलेल्या नियम व अटींचे आम्ही पालन केले; परंतु यासोबतच २० ते ४५ वयोगटातील बांधकाम मजुरांना लसीकरणास परवानगी देण्यात यावी, अशी मागणी आम्ही करत होतो. आता सरकारने १८ वर्षांवरील सर्वांना लसीकरणाची परवानगी दिल्याने बांधकाम व्यवसायाला चालना मिळणार आहे, असे मत बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञ अशोक मोहनानी यांनी व्यक्त केले.

१८ वर्षांवरील नागरिकांना लसीकरणाची परवानगी देण्याचा निर्णय हा अत्यंत स्वागतार्ह आहे. यामुळे बांधकाम क्षेत्रातील मजुरांना लस टोचून घेता येईल. साेबतच मजुरांना लवकरात लवकर लस टोचून घेता येईल यासाठीही उपाययोजना करायला हव्यात, असे मत बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञ प्रीतम चीवुकुला यांनी व्यक्त केले.

..........................