Join us

भूमाफियांकडून कांदळवनाची कत्तल करून बांधकाम; अधिकाऱ्यांची डोळेझाक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2023 2:39 PM

भूमाफियांच्या कारवायांकडे अधिकाऱ्यांची डोळेझाक

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : चारकोप खाडीनजीक कांदळवनाची उघडपणे नासधूस करीत भूमाफियांनी व्यावसायिक गाळे आणि चाळींचे बेकायदा बांधकाम सुरू केल्याने स्थानिक नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. याबाबत उच्चपदस्थ अधिकाऱ्यांकडे तक्रारी करूनही या भूमाफियांविरुद्ध कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशांचे तसेच मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन सुरू असलेले हे बांधकाम चारकोप पोलिस ठाण्यापासून अवघ्या पाच मिनिटांच्या अंतरावर आहे. एका कथित भ्रष्टाचारविरोधी संघटनेचा फलक लावून त्याआड हे अनधिकृत बांधकाम चालत असल्याचे चार दिवसांपूर्वी स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आले. नॉन डेव्हलपमेंट विभागात कांदळवनाचे उद्ध्वस्त करून या भूमाफियांनी या जागेत भरणी केली. त्यानंतर तेथे सिमेंट ब्लाॅकच्या साहाय्याने प्रत्येकी दोनशे चौ. फुटांचे सहा व्यावसायिक गाळे आणि एक कार्यालय उभारण्यात आल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते आणि युनायटेड असोसिएशन फॉर सोशल, एज्युकेशनल अॅन्ड पब्लिक वेल्फेअर ट्रस्टचे अध्यक्ष रेजी अब्राहम यांनी महापालिका, महसूल, वनखात्याचा खारफुटी विभाग तसेच महाराष्ट्र सागरी नियंत्रण व्यवस्थापन प्राधिकरण आणि पोलिस या विभागांकडे केल्या. त्यासोबत २००५ ते २०२२ या कालावधीतील सॅटेलाइट मॅपवरील छायाचित्रांच्या पुरावेही सादर केले.

या घटनेची माहिती मिळताच चारकोप पोलिस ठाण्याचा एक सहायक पोलिस निरीक्षक घटनास्थळी गेला आणि त्याने तेथील बांधकामाचे फोटो तसेच व्हिडीओचे चित्रीकरण केले. त्यानंतर सोबत तेथील दोन मजुरांना घेऊन तो पोलिस ठाण्यात गेला. मात्र कांदळवनाचे नुकसान करण्यात आल्याचे आढळूनही पुढे कोणतीच कारवाई झाली नसल्याचे रेजी अब्राहम यांनी सांगितले.  गेले चार दिवस संबंधित यंत्रणांना कळवूनही घटनास्थळी लोखंडी सळया, सिमेंटचे ब्लॉक पडून आहेत. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकाम करण्याची योजना असल्याचे आढळते. या संदर्भात या परिमंडळाचे पोलिस उपायुक्त तसेच महापालिका उपायुक्तांनाही कळवले. मात्र भूमाफियांकडून इतका गंभीर प्रकार होत असताना सारे उच्चपदस्थ अधिकारी गप्प का, असा सवालही अब्राहम यांनी केला.

 

टॅग्स :मुंबईसुंदर गृहनियोजन