मुंबई : २०२१ या वर्षात भारतातील सात शहरांमध्ये एकूण चार लाख २२ हजार घरांचे बांधकाम पूर्ण होणे नियोजित आहे. मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे या घरांचे बांधकाम पूर्ण होण्यास अधिक विलंब लागू शकतो. ॲनारॉक रिसर्च संस्थेच्या अहवालात अशी माहिती देण्यात आली आहे. कोरोनाचा प्रकोप संपूर्ण देशभर पहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे देशभरातील उद्योगधंदे ठप्प आहेत.
रिअल इस्टेट क्षेत्रालादेखील याचा फटका बसला आहे. लॉकडाऊनचे नियम व अटी यांमुळे बांधकाम प्रकल्पावर साधनांचा पुरवठा होण्यास अडथळा निर्माण होत आहे. त्याचप्रमाणे मजुरांचे झालेले स्थलांतर यामुळे यंदा अनेक बांधकाम प्रकल्प पूर्ण होण्यास विलंब होणार आहे. भारतातील एकूण नियोजित प्रकल्पांमध्ये दिल्ली एनसीआर प्रदेशात २८ टक्के, मुंबई महानगर क्षेत्रात २६ टक्के तर पुण्यात १८ टक्के या तीन शहरांमध्ये सर्वाधिक बांधकाम पूर्ण होणे नियोजित आहे. हल्ली ग्राहक रेडी टू मुव्ह घरांमध्ये राहायला जाण्यास पसंती दर्शवत आहेत. त्यामुळे बांधकाम प्रकल्प वेळेत पूर्ण होणे विकासकांना गरजेचे वाटते. मागील काळात मुद्रांक शुल्कात मिळालेली सवलत त्याचप्रमाणे ग्राहकांना परवडणारी घरे उपलब्ध झाल्यामुळे घरखरेदीची मोठ्या प्रमाणात नोंद झाली. त्यामुळे यंदा अधिक घरे तयार होणे गरजेचे आहे. मात्र कोरोनाच्या दुसर्या लाटेमुळे काही प्रकल्प उशिरा तयार होण्याची शक्यता वर्तविली गेली आहे.
शहरांनुसार २०२१ या वर्षात अपेक्षित घरे
दिल्ली एनसीआर - १,१६,७३०
मुंबई महानगर क्षेत्र - १,०९,९४०
पुणे - ७४,०२०
बंगळुरू - ५६,६५०
कोलकत्ता - २७,४७०
चेन्नई - २१,८३०
हैदराबाद - १५,८६०
एकूण - ४,२२,५००