Join us

मुंबईत गगनचुंबी टॉवर्स! ९० स्कायक्रॅपर्सची उभारणी; गोरेगाव, पवईत सर्वाधिक कामे

By मनोज गडनीस | Published: August 26, 2023 5:51 AM

मुंबई जगातील सहावे महाग शहर, काही बाबतीत दुबईपेक्षाही महाग

मनोज गडनीस, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मायानगरी, स्वप्ननगरी, देशाची आर्थिक राजधानी अशा बिरुदावल्या मिरविणाऱ्या मुंबई महानगराचा गगनचुंबी अर्थात स्कायक्रॅपर इमारती असण्याच्या बाबतीतही देशात अग्रक्रमांक लागतो. देशभरात एकूण २५० स्कायक्रॅपर इमारती असून त्यापैकी ७७ टक्के इमारती एकट्या मुंबईत आहेत.

सद्य:स्थितीत मुंबईतील अशा स्कायक्रॅपर इमारतींची संख्या १०० असून येत्या तीन वर्षांत त्यात आणखी ९० इमारतींची भर पडणार आहे. बांधकाम क्षेत्रातील एका अग्रगण्य संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती पुढे आली आहे. ज्या इमारतींची उंची १५० मीटर उंच आहे आणि ४० वा त्याहून अधिक मजले त्या इमारतीत आहेत, त्यांची गणना गगनचुंबी इमारतींमध्ये केली जाते.

मलबार हील, वरळी, मुंबई सेन्ट्रल, लोअर परळ, प्रभादेवी, वांद्रे (प.), खार, महालक्ष्मी, अंधेरी (प.) आणि सांताक्रूझ (प.) आदी ठिकाणी आलिशान घरांची विक्रमी विक्री झाली आहे.

सर्वेक्षण सांगते...

  • सध्या मालाड, गोरेगाव, पवई, विक्रोळी, कांजूरमार्ग या उपनगरांत प्रस्तावित ९० गगनचुंबी इमारतींचे काम सुरू आहे.
  • या नव्या इमारतींपैकी ७० टक्क्यांपेक्षा जास्त इमारती या निवासी वापरासाठी असल्याचे समजते. 
  • ग्राहकांची पहिली पसंती मध्य व दक्षिण मुंबईला आहे.

जानेवारी ते जूनमध्ये १० कोटी रुपये किंवा अधिक किंमत असलेल्या घरांच्या विक्रीमध्ये गतवर्षी याच कालावधीच्या तुलनेत ५० टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती इंडिया सोथबेज इंटरनॅशनल रिॲलिटी व सीआरई या संस्थेच्या सर्वेक्षणातून पुढे आली आहे. या सर्व व्यवहारांत दोन हजार कोटींपेक्षा जास्त उलाढाल झाल्याचा अंदाज आहे.

दुबईपेक्षा महाग

दुबईसारख्या चकचकीत शहराच्या तुलनेत गजबजलेल्या मुंबईचे प्रति चौरस फूट दर हे अधिक असल्याचेही या अहवालात नमूद आहे. दुबईमध्ये घरांचा प्रति चौरस फूट सरासरी दर हा ३० हजार रुपये आहे तर मुंबईत हाच दर ५० हजार रुपये इतका आहे.

जगातील सहावे महाग शहर

बांधकाम उद्योगातील नाईट फ्रँकच्या या अग्रगण्य संस्थेने केलेल्या ताज्या सर्वेक्षणानुसार, २०२३ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत मुंबईतील घरांच्या किमतीमध्ये ५.३ टक्क्यांची वाढ झाली आहे.

अशा आहेत गगनचुंबी इमारती

  • ८९% इमारती या निवासी वापरासाठी आहेत.
  • ५०% वाढ १० कोटी रुपयांवरील किमतीच्या घरांत 
  • ६% इमारती या व्यावसायिक वापरातील आहेत
  • ४% इमारती या निवास आणि व्यावसायिक अशा दोन्ही वापरांतील आहेत
  • १% इमारती या हॉटेलच्या आहेत
टॅग्स :मुंबईवरळीगोरेगाव