चैत्यभूमीवर प्रथमच हिरकणी कक्षाची उभारणी, मनपाचा पुढाकार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2023 09:32 AM2023-12-04T09:32:14+5:302023-12-04T09:33:37+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादनासाठी मुंबईत येणाऱ्या अनुयायांकरिता मुंबई पालिकेकडून सुविधा.
मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादनासाठी मुंबईत येणाऱ्या अनुयायांकरिता मुंबई पालिकेने विविध ठिकाणी सुसज्ज नागरी सेवासुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. यंदा महिला व नवजात बालकांकरिता चैत्यभूमी तसेच शिवाजी पार्क येथे हिरकणी कक्षाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
चैत्यभूमीतील आदरांजलीचे मोठ्या पडद्यावर थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. तसेच समाजमाध्यमांद्वारे देखील थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे, अशी माहिती उपायुक्त रमाकांत बिरादार यांनी दिली आहे.
माहिती पुस्तिका :
पालिकेकडून आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित सचित्र माहिती पुस्तिका काढली जाते. प्रतिवर्षी या पुस्तिकेच्या १ लाख प्रतींचे विनामूल्य वितरण केले जाते. ‘डॉ. आंबेडकर यांच्या जागतिक पाऊलखुणा’ ही यंदाच्या पुस्तिकेची मध्यवर्ती संकल्पना आहे.
नागरी सुविधा :
तात्पुरत्या निवाऱ्याची सोय म्हणून या परिसरातील पालिकेच्या सहा शाळा निश्चित करण्यात आल्या आहेत. येथे सर्व सेवा-सुविधा सुसज्ज ठेवण्यात आल्याचे ‘जी उत्तर’ विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत सपकाळे म्हणाले.
विश्रांतीसाठी मैदान:
पालिकेकडून या सुविधा चैत्यभूमी, छत्रपती शिवाजी महाराज मैदान (शिवाजी पार्क), डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान ‘राजगृह’ यासह आवश्यक त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. याचे नियोजन ‘जी उत्तर’ विभागाद्वारे करण्यात येत आहे. महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे येणाऱ्या अनुयायांना विश्रांतीसाठी छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे तात्पुरता निवारा, शामियाना उभारण्यात येत आहे.
या असणार सुविधा :
चैत्यभूमी येथे शामियाना व व्ही.आय.पी. कक्ष
११ ठिकाणी रुग्णवाहिकेसहित आरोग्यसेवा
१ लाख चौरस फूट क्षेत्रफळाच्या मंडपात निवारा
परिसरात पुरेशा संख्येतील फिरती शौचालये
पिण्याच्या पाण्याची व्यवस्था
संपूर्ण परिसरात विद्युत व्यवस्था
चौपाटीवर सुरक्षारक्षकासहित बोटींची व्यवस्था
राजगृह येथे नियंत्रण कक्ष आणि वैद्यकीय कक्ष
स्काऊट गाईड हॉल येथे भिक्खू निवास
धुळीचा त्रास रोखण्यासाठी आच्छादन
मोबाइल चार्जिंगकरिता व्यवस्था
फायबरच्या तात्पुरत्या स्नानगृह व तात्पुरत्या शौचालयांची व्यवस्था