मुंबई-
मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा 'लाव रे तो व्हिडिओ'च्या माध्यमातून मोठी खळबळ उडवून दिली आहे. राज ठाकरे यांनी मेळाव्यातील मोठ्या स्क्रीनवर माहिमच्या समुद्रातील एक ड्रोन फुटेज दाखवलं. यात माहिमच्या समुद्र किनाऱ्यापासून काही अंतरावर अनधिकृतपणे दर्ग्याची उभारणी गेल्या दोन वर्षात सुरू असल्याचं सरकारच्या निदर्शनास आणून दिलं आहे. तसंच संबंधित बांधकाम महिन्याभरात हटवलं गेलं नाही तर त्याच दर्ग्याच्या बाजूला आम्ही सर्वात मोठं गणपती मंदिर उभारू असा अल्टीमेटम दिला आहे.
राज्यकर्ते वेगळ्याच गोष्टींमध्ये व्यग्र असले की कारभाराचं काय होतं हे या एका उदाहरणावरुन दिसून येतं असं राज ठाकरे यावेळी म्हणाले. राज ठाकरेंनी दाखवलेल्या व्हिडिओमध्ये माहिमच्या समुद्र किनाऱ्यापासून काही अंतरावर पाण्यात काही माणसं चालत असल्याचं दिसतं. समुद्रात एका खडकावर एक कबर उभारली असल्याचं दिसतं आणि त्याठिकाणी दर्ग्याचे दोन झेंडेही लावण्यात आले असल्याचं दिसतं. संबंधित बांधकाम हे गेल्या दोन वर्षात झालं असून त्याआधी तिथं काहीच नव्हतं आणि याचे सॅटेलाइट फोटो आपल्याकडे आहेत, असंही राज ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.
"राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांना विनंती आहे की हे बांधकाम महिन्याभराच्या आत हटवलं गेलं पाहिजे. नाहीतर आम्ही त्याच दर्ग्याच्या बाजूला आम्ही भव्य गणपती मंदिर उभारू. तुम्ही जर त्यांच्याकडे दुर्लक्ष करणार असाल तर आमच्याकडे करा", असा अल्टिमेटम राज ठाकरे यांनी यावेळी दिला.
"माहिम पोलीस ठाणं याठिकाणाहून जवळ आहे तरी लक्ष नाही. महापालिकेचे अधिकारी तिथून फिरत असतात पण त्यांनी कधी पाहिलं नाही. राज्याकडे दुर्लक्ष असलं की अशा घटना होत असतात. मी खरंच आज तुम्हाला सांगतो माझ्या हातात हा महाराष्ट्र एकदा देऊन पाहा एकदम सूतासारखा सरळ करुन दाखवतो", असंही राज ठाकरे पुढे म्हणाले.