म्हाडा जमिनीवर बांधकाम; घ्यावी लागणार परवानगी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2023 06:05 AM2023-04-14T06:05:58+5:302023-04-14T06:06:17+5:30
म्हाडाच्या जमिनीवर बांधकाम करण्यासाठी बांधकाम परवानगी कक्षात कागदपत्र दाखल करून बांधकामाची परवानगी घेणे अनिवार्य असणार आहे.
मुंबई :
म्हाडाच्या जमिनीवर बांधकाम करण्यासाठी बांधकाम परवानगी कक्षात कागदपत्र दाखल करून बांधकामाची परवानगी घेणे अनिवार्य असणार आहे. बेकायदेशीर बांधकामाला जबाबदार असणारे मालक, भोगवटादार, त्यांचा कॉन्ट्रॅक्टर तसेच अशा बांधकामाला सहकार्य करणारे, संरक्षण देणाऱ्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला जाणार असून, असे बेकायदेशीर बांधकाम पाडून टाकण्यास म्हाडाला आलेला खर्च संबंधित व्यक्तीकडून वसूल केला जाईल.
म्हाडाला आता विशेष नियोजन प्राधिकरणाचे म्हणजेच बांधकाम नकाशे मंजूर करण्याचे अधिकार शासनाने प्रदान केले असून, मुंबई महापालिकेचे म्हाडा अभिन्यास संबंधित अधिकार संपुष्टात आले आहेत. म्हाडाच्या जमिनीवरील अतिक्रमण निर्मूलन कामी म्हाडा कार्यालयात स्वतंत्र अतिक्रमण निर्मूलन कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. तात्पुरत्या स्वरूपाच्या बांधकामासाठी परवानगीचे अधिकार संबंधित विभागाच्या कार्यकारी अभियंता यांना दिले आहेत. निवासी वापराच्या गाळ्याचा अनिवासी कारणासाठी वापर करावयाचा असल्यास विभागाचे मिळकत व्यवस्थापक / मुंबई मंडळ यांच्या कार्यालयाला अर्ज सादर करून प्रथम अधिकृत मान्यता प्राप्त करून घ्यावी, तसे न केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल.