Join us

बांधकाम व्यवसायिकांनी कमी किंमतीत आणि गुणवत्तपूर्वक घरांची निर्मितीकडे लक्ष द्यावे - नितीन गडकरी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2020 10:37 PM

बांधकाम व्यवसायिकांनी ग्राहकांसाठी कमी किंमतीत व गुणवत्तापूर्वक आधुनिक तंत्रज्ञानाचा उवयोग करून परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीकडे बांधकाम व्यवसायिकांनी जातीने लक्ष द्यावे

- मनोहर कुंभेजकरमुंबई - सध्या बांधकाम व्यवसाय कठीण परिस्थितीतून जात असून या व्यवसायाला उभारी येण्यासाठी बांधकाम व्यवसायिकांनी ग्राहकांसाठी कमी किंमतीत व गुणवत्तापूर्वक आधुनिक तंत्रज्ञानाचा उवयोग करून परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीकडे बांधकाम व्यवसायिकांनी जातीने लक्ष द्यावे, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज सायंकाळी अंधेरीत केले.

प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक डॉ सुरेश हावरे यांच्या "नानो हाउसिंग" या पुस्तकाचे प्रकाशन गडकरी यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.अंधेरी पूर्व येथील आयटीसी  मराठा हॉटेल मध्ये झालेल्या या कार्यक्रमात मुंबई भाजपा अध्यक्ष मंगलप्रभात लोढा,माजी शिक्षण मंत्री विनोद तावडे,डॉ.सुरेश हावरे,अमर हावरे,अमित हावरे आदी मान्यवर उपस्थित होते.

नितीन गडकरी पुढे म्हणाले की,बांधकाम व्यवसायकांनी घर निर्मिती करतांना आपल्या विचारात बदल करणे गरजेचे आहे.घर निर्मितीतून 15 टक्के आर्थिक फायदा मिळवण्यापेक्षा तो 40 ते 45 टक्के कसा मिळेल याकडे बांधकाम व्यवसायिकांचा कल असल्याची टिका त्यांनी केली.घरे रिकामी ठेवल्यावर भविष्यात घरांच्या किमती वाढतील याकडे त्यांचा कल असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. जमीनीची किंमत आणि बांधकामाला येणारा खर्च कमी झाला तर नक्कीच परवडणारी घरांची निर्मिती शक्य असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

घर विकत घेणाऱ्यांची आर्थिक क्षमता किती आहे याचा विचार करण्याची गरज असून याचा अभ्यास झाला नसल्याने आज बांधकाम व्यवसाय अडचणीत सापडला आहे.ग्रामपंचायतीत 3 लाख,50000 लोकसंख्येला 5 लाख,नगरपालिका क्षेत्रात 7 ते 8 लाख,अमरावती,अकोला आणि अन्य शहरांमध्ये 10 लाख,नागपूर आणि इतर मोठ्या शहरात 12 ते 15 लाख आणि मुंबई सारख्या ठिकाणी 20 ते 25 लाख किमतीत घरे मिळाली पाहिजेत असे मत त्यांनी व्यक्त केले.ग्राहकांच्या आर्थिक उत्पनांचा विचार न करता घरे बांधल्यास ती रिकामी राहतात अशी भूमिका त्यांनी मांडली.

4 टक्के कमी व्याजात पंतप्रधान आवास योजनेतून परवडणारी घरे कमी किमतीत कशी उपलब्ध होतील याचा सरकार विचार करत असल्याचे गडकरी म्हणाले.सरकारी कर्मचाऱ्यांसाठी रिटेल गृहनिर्माण प्रकल्पाच्या नव्या मॉडेलचा सरकार विचार करत असून यामध्ये 10 टक्के रक्कम सरकारी कर्मचाऱ्यांची तर 90 टक्के  भांडवल सरकार कर्ज म्हणून उपलब्ध करून देणार आहे.या कर्जाची रक्कम 15 वर्षात फेडल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांना हक्काचे घर मिळेल.यामुळे घरांची मागणी कमी होऊन सरकारचा भार देखिल कमी होईल असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला.

मुंबई दिल्ली नवीन द्रुतगती मार्गाचे काम प्रगती पथावर असून येत्या तीन वर्षात हा हायवे तयार झाल्यावर मुंबई ते दिल्ली हे अंतर 280 किलो मीटर कमी होणार असून मुंबई वरून दिल्लीत जयपुर मार्गे 12 तासात भविष्यात हे अंतर पार करता येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राज्याचे बांधकाम मंत्री जितेंद्र आव्हाड यांना  टोला लगावंतांना विनोद तावडे म्हणाले की, डॉ. सुरेश हावरे यांचे नानो हाउसिंग पुस्तक त्यांना मार्गदर्शक ठरेल. डॉ.सुरेश हावरे आपल्या प्रास्ताविकात म्हणाले की,नानो हौसिंग प्रणाली उपयोगात आणून आम्ही घरांच्या किंमती सुमारे 50 टक्यांनी कमी केल्या आहेत.70 % वाद है जमीन किंवा बांधकाम  वादातून होतात.त्यामुळे अनाधिकृत बांधकाम जर अधिकृत केला तर मोठ्या प्रमाणावर या व्यवसायाचे प्रश्न सुटू शकतील असे मत त्यांनी व्यक्त केले.

टॅग्स :नितीन गडकरीमुंबई