वरळी बीडीडी चाळींसाठी सॅम्पल फ्लॅटचे बांधकाम सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2020 12:59 AM2020-01-11T00:59:47+5:302020-01-11T00:59:56+5:30

मुंबईतील बीडीडी चाळींचा पुनर्विकास राज्य शासनाने म्हाडामार्फत हाती घेतला आहे.

Construction of Sample Flat for Worli BDD Rice | वरळी बीडीडी चाळींसाठी सॅम्पल फ्लॅटचे बांधकाम सुरू

वरळी बीडीडी चाळींसाठी सॅम्पल फ्लॅटचे बांधकाम सुरू

Next

मुंबई : मुंबईतील बीडीडी चाळींचा पुनर्विकास राज्य शासनाने म्हाडामार्फत हाती घेतला आहे. नायगाव, ना.म. जोशी मार्ग येथील बीडीडी चाळींचा पुनर्विकास कसा होईल हे बीडीडीतील रहिवाशांना समजण्यासाठी म्हाडाने येथे सॅम्पल फ्लॅटचे बांधकाम केले होते. याचप्रमाणे म्हाडाने आता वरळीतील बीडीडी चाळींच्या ठिकाणी सॅम्पल फ्लॅटचे बांधकाम सुरू केले आहे. हे बांधकाम पूर्ण झाल्यावर येथील बीडीडी चाळींचा पुनर्विकास झाल्यावर रहिवाशांना कसे घर मिळेल याबाबतचा अंदाज रहिवाशांना येणार आहे.
नायगाव, ना.म. जोशी मार्ग, वरळी येथील बीडीडी चाळींचा पुनर्विकास म्हाडाने हाती घेतला असून ना.म. जोशी मार्ग येथील बीडीडीतील २५३ रहिवाशांचे स्थलांतरही म्हाडाने संक्रमण शिबिरांमध्ये केले आहे. तर उर्वरित रहिवाशांनाही प्रकल्पामध्ये सामील होण्याची संमती दिल्यावर त्यांना स्थलांतरित करण्यात येणार आहे. म्हाडामार्फत होत असलेल्या पुनर्विकासामध्ये सामील होण्याची ज्या रहिवाशांनी संमती दिली आहे त्यांच्यासोबत म्हाडाने करारही केला आहे.
पुनर्विकास प्रकल्पामध्ये सामील झालेल्यांना लॉटरीद्वारे मिळणार घरे बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पामध्ये रहिवाशांच्या कायदेशीर सुरक्षेसाठी म्हाडाकडून भविष्यात आॅनलाइन लॉटरी काढण्यात येणार आहे. रहिवाशांना मिळणारे घर नेमके कुठे असेल, कोणते असेल, ते कोणत्या मजल्यावर असेल, तसेच सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करण्यात येतील, याची संपूर्ण खात्री पटण्याचा मार्ग म्हाडाने खुला केला आहे. ना.म. जोशी मार्ग येथील बीडीडी चाळींच्या पुनर्विकास प्रक्रियेला सुरुवातही झाली आहे. आतापर्यंत २५३ कुटुंबीयांनी प्रकल्पामध्ये सहभागी होण्यास संमती दिल्याने त्यांना संक्रमण शिबिरामध्ये स्थलांतरित केले आहे. मात्र, यापुढील टप्पा म्हणून म्हाडाकडून प्रकल्पामध्ये सहभागी झालेल्यांची लवकरच लॉटरी काढण्यात येणार आहे. या लॉटरीचा मुख्य उद्देश हा रहिवाशांमध्ये प्रकल्प पूर्ण होण्याविषयी विश्वास निर्माण करण्याबाबतचा आहे. या अनुषंगाने लॉटरी जाहीर करून भविष्यातील पुनर्विकास प्रकल्पाची ग्वाही देण्याची तयारी सुरू आहे. यासह त्यांच्या घराच्या सर्व कायदेशीर बाबीही पूर्ण करण्यात येतील, या दृष्टीने पावले उचलली जात आहेत.
म्हाडाच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून तयारीदेखील सुरू करण्यात आली असून, ही लॉटरी पूर्णपणे पारदर्शक राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. कायदेशीर बाबीसुद्धा म्हाडाकडून पूर्ण केल्या जाणार आहेत. रहिवाशांना कोणत्याच प्रकारची अडचण राहणार नाही़

Web Title: Construction of Sample Flat for Worli BDD Rice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.