राजापूर : रेल्वेचे मंत्रीपद लाभताच आम्ही १ लाख १० हजार कोटी खर्चाची तरतूद केली. त्याचा फायदा कोकण रेल्वेची कामे मार्गी लावताना होत असून, सौंदळचे काम देखील त्यामधून मार्गी लागत आहे. साधारणत: जानेवारी महिन्यापासून या स्थानकाच्या कामाला सुरूवात होईल व वर्षाअखेरीला ते पूर्ण होईल, असा विश्वास केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी सौंदळ येथे नूतन स्थानकाच्या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी व्यक्त केला.यावेळी व्यासपीठावर रत्नागिरी - सिंंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत, आमदार राजन साळवी, हुस्रबानू खलिफे, माजी आमदार गणपत कदम, बाळ माने, जि. प. अध्यक्ष जगदीश राजापकर, सभापती सोनम बावकर, कोकण रल्वेचे व्यवस्थापक भानुप्रसाद तायल, सौंदळ स्थानकासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे चंद्रकांत देशपांडे आदी उपस्थित होते.मागील अनेक वर्षे सौंदळ स्थानकासाठी जोरदार पाठपुरावा जनतेकडून सुरु होता.अखेर त्याला यश प्राप्त झाले व रल्वेमंत्री सुरेश प्रभूंनी तत्काळ मान्यता देत २५ कोटी रुपये मंजूर केले होते. यापूर्वी या मतदार संघाचा खासदार असताना हा प्रश्न सातत्याने समोर आला होता. मात्र, त्यावेळी अनंत अडचणी येत होत्या काहीतरी कारणं सांगितली जात असत. देशाचा वित्त विभाग किती पैसे देणार त्यावर रेल्वेची कामे ठरायची. मात्र, या खात्याच्या मंत्रीपदाची सुत्रे हाती घेतली व तत्काळ १ लाख २० हजार कोटीच्या खर्चाची तरतूद आपण केली होती. कारण कोकण रेल्वे ही स्वायत्त संस्था असल्याने तिची जबाबदारी केंद्र सरकारवर होती. यापूर्वी बॉण्ड काढून पैसा उभारावा लागला होता आणि समाधानकारक विकासकामे मार्गी लागत नव्हती. तथापि खर्चाची तरतूद झाली आणि त्यातून अनेक कामे करणे शक्य झाले आहे. देशातील बंदरे भविष्यात रेल्वेने जोडण्यात येणार असून, राजापुरात असे महत्वाचे बंदर असल्यास सांगा त्यादृष्टिने प्रयत्न करु, असे सांगितले. या देशात रेल्वेचे जाळे सर्वत्र पसरावे यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार असल्याची त्यांनी माहिती दिली. सौंदळ स्थानकाचे काम जानेवारी महिन्यापासून सुरु होईल व ते वर्षाअखेरपर्यंत पार पडेल अशी माहिती दिली. कोकण रेल्वेने शिक्षा अभियान अशी व्यापक मोहीम सुरु केली आहे. त्याचे उद्घाटन सुरेश प्रभूंच्या हस्ते यावेळी पार पडले. (प्रतिनिधी)
सौंदळ स्थानकाची वर्षात उभारणी
By admin | Published: October 16, 2015 9:12 PM