मुंबई: बांधकाम व्यावसायिकाच्या संथ कामामुळे मुंबई पोलीस मुख्यालयातील नवीन इमारतीचे बांधकाम तब्बल ३२ महिन्यांपासून रखडल्याची बाब माहिती अधिकारातून समोर आली आहे. या कासवगती कामाबद्दल व्यावसायिकाकडून तब्बल १६.६८ लाखांचा दंड वसूल करण्यात आल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे. क्रॉफर्ड मार्केट येथील मुंबई पोलीस मुख्यालयाच्या प्रांगणात गेल्या चार वर्षांपासून ६ मजली इमारतीचे काम सुरु आहे. या कामाची सविस्तर माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी प्रशासनाकडे विचारली होती. त्यानुसार, प्रस्तावित इमारतीच्या कामाचे आदेश कंत्राटदार मेसर्स चौधरी अॅण्ड चौधरी या कंपनीला २५ आॅगस्ट २०११ दिले होते. या कामासाठी ३२ कोटींचा खर्च निविदा प्रक्रियेतून निश्चित करण्यात आला होता. तळमजल्यासह सहा मजल्यांची इमारत पूर्ण करण्यासाठी १८ महिने कालावधी निश्चित करण्यात आला होता. कामाच्या विलंबामुळे १ जून २०१४ पासून ते ३१ आॅगस्टपर्यंत व्यावसायिकावर १६ लाख ६८ हजारांची दंडात्मक कारवाई करण्यात आली. प्रकल्पाची वाढीव रक्कम २२.५५ कोटी आहे. अंतर्गत सजावटीसाठी ५.७५ कोटी, स्वयंपाकगृह व भोजनालयगृहसाठी २३ लाख, तसेच वातानुकूलित यंत्रासाठी २.६९ कोटी खर्च अपेक्षित आहे. प्रकल्पाच्या वास्तुविशारद यास ३६ लाख ४८ हजार ३२९ रुपये देण्यात आलेले आहे. हे काम मेसर्स हाफिज कॉन्ट्रॅक्टर यांच्याकडून करण्यात आले आहे. या इमारतीमध्ये ३२ अधिकारी आणि ९५० कर्मचाऱ्यांची बसण्याची सोय असेल, अशीही माहिती देण्यात आली.
३२ महिन्यांपासून बांधकाम रखडले
By admin | Published: October 16, 2015 3:11 AM