मुंबई - वर्सोवा मेट्रो स्टेशन जवळ चारबंगला येथील पूर्वी असलेल्य मुद्रण कामगार नगरच्या जागेवर असलेेल्या येथील रहिवाश्यांच्या 13 इमारती जमीनदोस्त करून येथे आता बांधा, वापरा व हस्तांतरीत करा या तत्वाखाली आता येथे उद्योग भवन उभारण्याची योजना शासनाने आखली आहे. त्यामुळे येथील मुद्रण कामगार नगर वसाहत जमीनदोस्त करण्यात आली असून येथे शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागातर्फ़े उद्योग भवन उभारण्याचे काम सध्या सुरू आहे.
या कामाचे कंत्राट हे हब टाऊन (आकृती डेव्हलपर) विकसीत करण्यासाठी शासनाच्या सार्वजनिक बांधकाम खात्याने दिले आहे. येथील या भूखंडाला असलेली 3754.20 चौमीटर भूखंड हा डी सी रुल 23 अन्वये 15 टक्के आरजी प्लॉट(खेळाच्या मैदान)साठी येथील फेडरेशन ऑफ कॉप होसिंग सोसायटीज ऑफ मॉडेल टाऊन लिमिटेडसाठी राखीव आहे. मात्र, आता रहिवाश्यांच्या खेळाच्या मैदानाच्या भूखंडावर मंदिराची उभारणीचे काम सुरू असून मॉडेल टाऊन फेडरेशनने सदर काम थांबवावे अशी मागणी करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे धाव घेतली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की,1962 साली येथील भूखंड शासनाने शासकीय कर्मचारी वसाहत, आयएएस अधिकारी वसाहत, शाळा आणि मैदानासाठी दिला होता. येथे शासनाने चर्निरोड येथील शासकीय मुद्रण प्रेसमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानासाठी 13 इमारती बांधल्या होत्या. आणि येथे हनुमान मंदिर आणि व्यायाम शाळा देखील होती.
येथील या जागेवर कंत्राटदरकडून मंदिर बांधण्याचे काम सुरू असल्याची माहिती फेडरेशनने लोकमतशी बोलतांना दिली.यापूर्वी येथे हनुमान मंदिर अस्तित्वात असून आता येथील आरजी प्लॉटवर नव्याने मंदिर बांधण्याचा घाट विकासकाने घातला असल्याची माहिती त्यांनी दिली.येथे पूर्वी असलेल्या हनुमान मंदिर पाडून येथील जयप्रकाश रोड वर मोक्याची जागा हडप करण्याचा हा डाव असल्याचा आरोप फेडरेशनने केला आहे. यापूर्वी फेडरेशनने वारंवार पत्रव्यवहार करून सदर सत्य परिस्थिती संबंधितांना कळवली आहे. येथील लहान मुलांसाठी असलेले खेळाचे मैदान बिल्डरच्या घशात जाऊ नये यासाठी विनाविलंब बांधकाम थांबवून झालेले या प्लॉटवरील बांधकाम तोडण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी फेडरेशनने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.